माझा खारीचा वाटा- नम्रता कुलकर्णी

16 मार्च रोजी महाराष्ट्रात सुरू झाले आणि त्यानंतर आजपर्यंत भलेबुरे बोलत आलो त्या समाज माध्यमांचा महत्त्व आपल्याला कळायला लागले. या माध्यमांद्वारे बऱ्याच लोकांनी आपापले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या कोरोनामुक्त अभियानातील ‘करोना योद्धा’ म्हणून काम केलेल्या कामाचा अनुभव वाचनात आले. त्यातच अनुलोम द्वारे करोना मुक्त ठाणे अभियानासाठी स्वयंसेवकांची गरज असल्याचा मेसेज आला.
मी, सौ. नम्रता कुलकर्णी, MSW, करून एका विशेष शाळेत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदावर गेली सोळा वर्षे पूर्णवेळ कार्य करत आहे. लॉकडाऊन झाल्यापासून सर्व बाजूंनी बाहेरील परिस्थिती वेगवेगळ्या माध्यमांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत होती। सर्व पाहून ऐकून मनात भीती निर्माण झाली होती, यापुढे आपल्याला कधीच घराबाहेर पडता येणार नाही का?
पुढचे सर्व आयुष्य फक्त खाणे-पिणे झोपणे यातच जाणार आहे का ?
बाहेर पडल्यावर स्वतःला कोरोनापासून कसे वाचवायचे, हा हेच विचार, भावना सतत मनात यायचे. आपण फारच निरुपयोगी आयुष्य जगतोय ही भावना बळावत चालली होती, आणि बरोबर त्याच वेळेस हा मेसेज आला व आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची संधी चालून आली आहे या विचाराने उचल खाल्ली.
परंतु आता मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहे तिथे आपल्याकडे स्त्रियांवर बऱ्याच जबाबदाऱ्या बांधिलकी असतात. ज्या सोडून सध्या कामासाठी बारा-तेरा दिवस घराबाहेर पडणे फारच सोपं नसतं, परंतु आपण न बोलताच राहणही नाही मला शक्य नव्हतं, कारण आता बाहेरही असं काम करणाऱ्या माणसाची गरज आहे. त्यामुळे मनाचा हिय्या करून माझी इच्छा यजमानांना बोलून दाखवली, त्या आधी स्वतःच्या मनाची जाता येणार नाही यासाठी तयारी करून ठेवली होती. परंतु माझ्या सुदैवाने त्यांनी पहिल्या फटक्यात ‘तुझी इच्छा आहे ना हे काम करायची जरूर जा’ असं सांगत हिरवा कंदील दाखवला. अर्धी मजल मारून झालेली होती. आता मुलींशी बोलायचे होते, त्या दोघीही 18 व 23 वर्षाचा आहेत, त्या दोघीही लगेचच हो म्हणाल्या.
त्यांना परत एकदा मी घरात नसल्यावर त्यांच्यावर पडणाऱ्या कामाचे जाणीव करून दिली. त्या तिघांनीही सांगितलं एकदा जायचं ठरवलं तर इथला विचार करू नको, असे मला परत परत सांगितले. हा एक मोठा टप्पा सहज पार झाल्या पडल्यामुळे आत्मविश्वास वाढला.

दिनांक 17 मे रोजी आवश्यक त्या सामानाची बॅग घेऊन यजमानांनी शिवसमर्थ विद्यालयात सोडले. तिथे मीटिंगची जय्यत तयारी करण्यात आली होती. आमची एकूण सात जणांची महिला तुकडी होती. वयोगट 20 ते 50 वर्षे, तिथे आमची नोंदणी वैद्यकीय तपासणी झाली. यामध्ये बिपी, शुगर चेक करून इतर वैद्यकीय इतिहास घेण्यात आला. त्याच वेळी आम्हाला चार दिवसांसाठी लागणारे PPE kits व 10 ते 12 दिवसांसाठी लागणारे आवश्यक सामान देण्यात आले. त्यानंतर या अभियाना संबंधीची माहिती देण्यात आली. आत्तापर्यंत करण्यात आलेले काम व आम्ही करण्याचे काम याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित डॉक्टर व आधी काम केलेले कार्यकर्ते यांनी kit कसे काढायचे व उतरवायचे याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तिथे आमच्या त्या दिवशीच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. जेवणानंतर आम्हाला आमच्या राहण्याच्या सोयी असलेल्या भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या आवारातील हॉलमध्ये सोडण्यात आले. येथे आमची अतिशय चोख व्यवस्था लावण्यात आली होती.
सात जणांना पुरेशी स्वच्छतागृहे चोवीस तास पाणी व रोज साफसफाईची सोय होती.
दुसऱ्या दिवशीपासून सकाळी उठल्यावर विपश्यना, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार अशी दिवसाची सुरुवात झाली.
गुरुवार दिनांक 21 मे पासून आमचे फील्ड वर्क सुरू झाले.
आम्ही सहाजणी असल्यामुळे तीन जणींचे दोन गट तयार करण्यात आले. कामाला जाण्याआधी एक तास आम्ही PPE kit घालण्याची तयारी करत असू व ते घातल्यानंतर आम्हाला गाडीतून आमच्या कामाच्या ठिकाणी चेंदणी कोळीवाडा येथे गाडीने सोडण्यात येई. त्यासाठी पूर्णवेळ राष्ट्रसंघाचे कोणी ना कोणी field वर हजर असत. त्याचप्रमाणे PPE kit घालण्यापूर्वी आम्हाला दररोज इलेक्ट्रॉलचे पाणी पिणे compulsory होतं. कारण Kit घातल्यानंतर पाणी पिता येत नाही. पहिल्या दिवशी अंदाज यावा यासाठी दीड तास वस्तीमध्ये काम केले. तीन पैकी एकजण ताप बघेल, एक माहिती घेईल व एक गोळ्या देऊन त्यासंबंधीची माहिती देईल असे कामाचे वाटप केले. त्यानंतर ते तीनही दिवस वेळेचा व कामाचा आलेख चढताच राहिला. दररोज आल्यानंतर किती घरे झाली पाहिजे ते ठरवायचं व तेवढे टारगेट पूर्ण करायचं.
पहिल्या दिवशी 89
दुसऱ्या दिवशी 181
तिसऱ्या दिवशी 222
व चौथ्या दिवशी 276
अशाप्रकारे एकूण दोनशे दोन हजार व्यक्तींची तपासणी केली. येथे विशेष नमूद करणे अनिवार्य आहे की, या अभियानामध्ये करोना योद्धा म्हणून जेव्हा आम्ही फील्ड वर जात होतो तेव्हा आम्हाला हे काम करता यावे व आम्हाला काही होऊ नये यासाठी पडद्यामागे राहून खूप मोठी यंत्रणा अहोरात्र काम करत होती. इतके मोठे व जोखीम असलेले अभियान राबविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, बॅक ऑफिस, खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, वस्तीमधील कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, नियोजन, मनुष्यबळ उभे करणे, गाड्या, औषधे, इतर साहित्य या सर्वांची सोय करणे व सर्वांमध्ये समन्वय साधणे….. सांगू तितके कमीच आहे.


परत याची कुठेही वाच्यता, चर्चा नाही. सर्व काम
कशाचीही अपेक्षा न ठेवता. कुठे काही गडबड गोंधळ नाही. नियोजनात आयत्यावेळी बदल करावा लागला तरी कुणावर चिडत नाही, आरडाओरडा नाही, सर्व काही शांत आणि सुरळीत पार पडले.आमचे चार दिवसांचे काम झाल्यानंतर, चार दिवस आम्ही विलगीकरणात पूर्ण आराम केला.अतिशय उत्कृष्ट खाणेपिणे तसेच गप्पा गोष्टी, वेगवेगळ्या activities, संध्याकाळी दिवेलागणीला रामरक्षा, शुभंकरोती, मारुती स्तोत्र पठण, रात्री कधी सिनेमा बघणे तर कधी इतर बैठे खेळ खेळणे व नंतर झोपणे असा दिनक्रम होता.
आम्ही आलो त्या दिवसापासून दररोज दोन वेळा आयुष च्या गोळ्या, दिवसभर गरम पाणी, रात्री झोपण्याआधी हळद दूध काळजी घेतली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हुतात्मा दिन या निमित्ताने शाखा लावली व गाणी म्हणली.
चार दिवस झाल्यानंतर आमची सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, आता आम्ही सर्व रिपोर्ट च्या प्रतीक्षेत आहोत…. अतिशय अधिरपणे.
या अभियानात सामील झाल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट शिकायला मिळाली म्हणजे, सकारात्मकता. इथल्या वातावरणामुळे कधीच भीती वाटली नाही. पहिल्या दिवसापासून आम्हाला सर्वांना असेच वाटत आले की, आपण व्यवस्थित राहणार आहोत. आपल्याला काही होणार नाहीये. कारण आम्हाला असे वाटते की, आपण अतिशय चांगल्या उद्देशाने एखादे काम करत आहोत, तर त्याचा रिझल्ट ही चांगलाच येणार. सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा या अभियानात सामील होण्यासाठी फोन केला तेव्हा, माझा अंदाज होता की समोरून माझं वय ऐकल्यानंतर मला रिजेक्ट करतिल, परंतु रा. स्व. संघाच्या टीमने याचा साधा उल्लेखही केला नाही.
पहिल्यादिवशी काम करेपर्यंत मी साशंक होते, मला चिंता वाटत होती की आपण सेवा द्यायला आलोय. पण आपलं तिथल्या लोकांना करायला लागू नये.पण इथल्या कोणीच अशी पुसटशी शंकाही घेतली नाही. आमच्या महिला गटातील कोणीही मुलींनी मला, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असल्याची जाणीव कधी होऊ दिली नाही. उलट मी त्यांना मध्ये मध्ये त्यांच्या आईची आठवण करून देत होते (आईसारखं काहीतरी बोलून). खूपच खेळीमेळीच्या वातावरणात दिवस गेले, या अनुभवातून शिकलेले अजून एक गोष्ट म्हणजे आपण बायका फार गैरसमजुतीत असतो की आपले घर आपल्या शिवाय राहणार नाही. घरात खूप गडबड गोंधळ होईल. पण असं काही होत नसतं. वेळ आल्यावर सर्व जण मिळून व्यवस्थित घर सांभाळतात आपण उगाच त्याला नको इतकं महत्त्व देतो. ही तर आपल्याला एखादी गोष्ट न करण्याची पळवाट असते. हेही तितकेच खरे की, यासाठी आपल्या कुटुंबालाही आपणच तयार करावे लागते. कारण घरातली बाई असं काही करायला निघाली की समाजातून दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, त्यासाठी आपण आपले कुटुंब दोघांचीही मानसिक तयारी असावी लागते. तिथे विशेष सांगावेसे वाटते की, या कामासाठी मला खूपच अनपेक्षित ठिकाणाहून प्रशंसा प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. तर आपण आपली म्हणणाऱ्या कित्येक माणसांकडून तटस्थ किंवा नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. या कामातून मला स्वतःला भरपूर सकारात्मकता मिळाली, तसेच माझ्यातल्या शक्तीची परत एकदा नव्याने जाणीव झाली. रा. स्व. संघ कीती लोकांना एकत्र बांधून ठेवून निस्वार्थीपणे समाजासाठी निरंतर काम करत आहे, याचा जवळून अनुभव घेता आला. शेवटी जगात ही अशी काम करणारी माणसे आहेत म्हणूनच जगावर कितीही संकटे आली तरी काम करणाऱ्या व्यक्तींमुळे जगाचा डोलारा उभा आहे व त्यात खारीचा वाटा उचलला.
।जय हिंद।

  • नम्रता कुलकर्णी.

 1,220 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.