ठाणे जिल्हा परिषदेने करून दाखवले

टँकर मुक्त आणि जलयुक्त गावे, मे महिन्यातही नळाला धो धो पाणी

बदलापूर : “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” हि म्हण ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रत्यक्षात करून दाखवली आहे. ज्या गावात जानेवारी महिन्यापासून टँकरची वाट पहावी लागत असे त्या गावांमध्ये मे महिन्यात विहिरी भरलेल्या आहेत. काही पाड्यांमध्ये तर सौर उर्जेवर यंत्रणा सुरु केल्याने या पाड्यात नळामधून धो धो पाणी येत आहे. जिथे जेमतेम स्वयंपाकासाठी पाणी वापरणारे आदिवासी चक्क मे महिन्यात आपली घरे बांधत आहेत. इतके दिलासादायक चित्र या गावांमध्ये पहावयास मिळत आहे.
अंबरनाथ, मुरबाड आणि कर्जत तालुक्याच्या वेशीवर असलेली पाटगांव, कामतवाडी आदी गावांबरोबरच करचोंडे, माळ, झाडघरमधील शिसेवाडी आणि डोंगरवाडी, तुळई, खोपिवली, धसई, देहरी, उचले आदी गावे आणि पाड्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि जलयुक्त शिवार या दोन योजनांच्या माध्यमातून गावातील विहिरींची खोली आणि रुंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून हि योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तळ गाठणाऱ्या या विहिरींमध्ये या योजनेच्या माध्यमातून काम करण्यात आले. त्यामुळे या जीवदान लाभलेल्या विहीरींमध्ये आता मे महिन्यातही सरासरी पाच मिटर इतकी पाण्याची पातळी आहे. परिणामी या गावातील नागरिकांची विशेष करून महिलांची या काळात पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने हे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले असून पहिल्या टप्प्यात मुरबाडमधील दहा गावे आणि बारा पाडे टंचाईमुक्त केले आहेत. गावात अथवा गावाबाहेर असणाऱ्या या विहीरींची नीट देखभाल दुरूस्ती केली. तिथून गावात पाणी योजना राबवली, तर टंचाईचे संकट टाळता येणार आहे. गेल्या दोन वर्षात अतिटंचाईग्रस्त निवडक गावपाड्यांमधील विहीरींना जीवदान देऊन प्रशासनाने हे सिद्ध करून दाखवून दिले आहे.
पाटगांव हे टंचाईग्रस्त गावांपैकी एक प्रमुख गाव. अगदी दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथील विहीरी कोरड्या पडल्या की पाण्यासाठी टँकरची वाट पहायला लागायची. मात्र आता हे चित्र बदलले आहे. या गावात आठ वाड्या आहेत. बहुतेक कुटुंबे ठाकुर, आदिवासी समाजाची आहेत. या गावाची सीमा थेट रायगड जिल्ह्याच्या हद्दीला भिडते. हे गाव अंबरनाथ, मुरबाड आणि कर्जत तालुक्याच्या वेशीवर आहे. अतिशय दूर असणाऱ्या पादीरवाडी, जुनी गेटवाडी, कामतवाडी येथील पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या रहिवाशांचे जीवन आता मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने अतिशय आनंदी झाले आहे. कामतवाडी मध्ये तर सौरउर्जेद्वारे लघु नळपाणी योजना राबवून थेट गावकऱ्यांच्या दारात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्यांना हवे तेंव्हा सौर पंप सुरु करून पाणी घेत आहेत. याच वाडीमध्ये दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात घरात लागणारेच अत्यवश्यक पाणी आणण्यात येत असे. कारण लांबून डोक्यावरून पाणी आणावे लागत असल्याने मर्यादा असत. या गाव पाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी अंबरनाथ येथील स्पंदन फाउंडेशनचे डॉ. राहुल चौधरी यांनी वॊटरव्हिल उपलब्ध करून दिले होते. जेणे करून महिलांना डोक्यावरून तीन तीन हंडे पाणी आणण्यापेक्षा हंड्याना चाक असल्याने हे हंडे खेचून नेने सोयीचे ठरत होते. आता मात्र या गावात उन्हाळ्यात भरपूर पाणी उपलब्ध झाल्याने चक्क घर दुरुस्ती आणि नवीन घरे बांधण्याची कामेही या सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपाद्वारे पाणी घेऊन केले जात आहे हे विशेष.
या भागातील बहुतेक विहीरी सरासरी पाच मिटर इतक्या खोल होत्या. त्यांची योग्य ती देखभाल, दुरूस्ती नसल्याने तेथील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असे. पावसाळयात या विहारी तुडुंब भरून वहात असत. मात्र जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात त्यातील पाणी तळाला जात असे. मार्च महिन्यात बहुतेक विहीरी कोरड्या पडत. जिल्हा प्रशासनाने या विहीरींची पुनर्बांधणी करताना त्या दहा ते बारा मिटर इतक्या खोल आणि आठ मीटर इतक्या रुंद केल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत पुनरूज्जीवीत होऊन विहीरींमध्ये मुबलक पाणीसाठा होऊ लागला आहे. मुरबाडमधील योजना राबविलेल्या प्रत्येक विहीरींमध्ये सध्या सरासरी पाच मिटर इतके म्हणजे किमान दोन लाख लिटर्स पाणीसाठा असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता जयदिश बनकरी यांनी दिली. लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्यावर योजना यशस्वी होते हे या योजनेवरून दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार किसन कथोरे हे यासाठी पाठपुरावा करत असल्याचे बनकरी म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी पाणी भरण्यासाठी सकाळी आणि रात्री डोक्यावरून हंडे भरून आणावे लागत असे. आता घराजवळ नळाने पाणी येत असल्याने डोक्यावरून हंडे भरून आणायचा त्रास दोन वर्षांपासून वाचला आहे. आता मात्र आम्हाला पाहिजे त्यावेळेस पाणी भरू शकत असल्याने आमचा पाणी भरायचा वेळ आणि मेहनत वाचतो. या वेळेत आम्ही सर्वजण शेतीची कामे, मोलमजुरी करू शकतो असे कामतवाडी, पाटगांव येथील आणीबाई नाथा काथवरे आणि सुनीता संतोष पादीर यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी हि योजना गावासाठी आणली. काही ठिकाणी काही ग्रामस्थांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती मात्र योजना समजावून सांगितल्यानंतर सर्वांनी सहकार्य केले. विहिरींची खोली आणि रुंदी वाढल्याने विहिरींमधील पाणी साठा वाढत आहे. पाणी साठा वाढल्याने गाव पाड्यातील महिलांची मेहनत वाचली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आनंद दिलासादायक आहे असे माजी सभापती जनार्दन बाळू पादीर यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलयुक्त शिवार योजना यासारख्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून मुरबाड मतदार संघ हा टँकर मुक्त करण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे. टँकर मुक्त मतदार संघ करतानाच भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन गाव पाड्यांमध्ये पाणी साठवण्याच्या विविध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

 537 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.