लागोपाठ होणारी ही तीन ग्रहणे अशुभ नाहीत


जेष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचा निर्वाळा

ठाणे : यावेळी लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असल्याने काहीतरी वाईट घटना घडतील असे भाकीत काही ज्योतिषानी वर्तविले आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी सन २०१८ मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती . त्यावेळी काहीही वाईट घटना घडल्या नव्हत्या तसेच यानंतर सन २०२९ मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यावर्षी आलेल्या लागोपाठ तीन ग्रहणांविषयी दा. कृ. सोमण यांनी सविस्तर माहिती दिली.
शुक्रवार ५ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीभोवती असलेल्या विरळ सावलीतून जेव्हा जाते त्यावेळी ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते. याला ‘ मांद्य चंद्रग्रहण- Penumbral Eclipse ‘ असेही म्हणतात. भारतातून हे चंद्रग्रहण शुक्रवार ५ जून रोजी रात्री ११ वाजून १३ मिनिटांपासून उत्तररात्री २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत दिसणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारताप्रमाणेच प्रशांत महासागर, आॅस्ट्रेलिया,यूरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेश येथून दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेत आल्याने पौर्णिमा असूनही कमी तेजस्वी दिसते.
रविवार २१ जून रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. मुंबईतून हे सूर्यग्रहण सकाळी १० वाजून १ मिनिटांपासून दुपारी १ वाजून २८ मिनिटांपर्यंत दिसणार आहे. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. त्यामुळे दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण नेहमी ग्रहणचष्म्यातूनच पहावे. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलईस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.
रविवार ५ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड येथून दिसेल.
लागोपाठ तीन ग्रहणे अशी अनेकवेळा झाल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी सन २०१८ मध्ये १३ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, २७ जुलै रोजी खग्रास चंद्रग्रहण आणि ११ आॅगस्ट रोजी खंडग्रास सूर्यग्रहण झाले होते. यावर्षी लागोपाठ होणार्या तीन ग्रहणानंतर सन २०२९ मध्ये १२ जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, २६ जून रोजी खग्रास चंद्रग्रहण आणि ११ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
ग्रहणे हा नैसर्गिक खगोलीय अविष्कार आहे . त्यांचा पृथ्वीवर काहीही अनिष्ट परिणाम होत नाहीत असेही दा. कृ. सोमण यानी स्पष्ट केले.

 573 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.