राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपाला उपरोधिक टोला
मुंबई : फडणवीस म्हणतात आम्हाला विचारले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालांना भेटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी इतके वर्षे काम केलंय आता मात्र मुख्यमंत्र्यांचा नंबर ते विसरलेत का अशी असा उपरोधिक सवाल करत तुमच्या सुचना असतील तर मन मोठे करून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त व्हा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
आपला देश एकसंघ दिसावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या आम्ही वाजवल्या. त्यांनी सांगितले दिवे लावा आम्ही लावले परंतु महाराष्ट्रात दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. भाजपमंडळींना राजकारण करायचे आहे म्हणून महाराष्ट्रात आंदोलन पुकारलं असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. कोरोनासमोर संपूर्ण जगच हतबल झाले आहे. अशातच भाजपाचे लोक राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. आम्हीही विचारू शकतो, देशात कोरोना आला कसा?कोरोना आला तेव्हा पंतप्रधान ट्रम्पच्या स्वागतात व्यस्त होते असं आम्ही म्हटलं नाही मात्र भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातंय असेही ते म्हणाले.
भाजपचे लोक रोज येऊन सांगतात आम्ही ऐवढी मदत केली तेवढी मदत केली. हा प्रसंग जाहिरातीचा आहे का ? मदत केली तर त्याची जाहिरात कशाला हवी ? असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसही मदतीचे आकडे देऊ शकते मात्र अशा संकटकाळी आम्हाला कोणताही बडेजाव करण्यात? रस नसल्याचे त्यांनी सांगितले.
मजूरांची परिस्थिती खूप वाईट आहे. राज्य सरकारने सर्व व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी पाठवले, त्याबद्दल मजूर महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहे. मात्र तिथले सरकार मजूरांना राज्यात घ्यायला तयार नसल्याचा आरोप करत यातले बहुतांश राज्य भाजपशासित असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
448 total views, 1 views today