गुढकथांचा कर्ता हरपला

जेष्ठ साहित्यीक, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन

मुंबई : मराठी साहित्यात वाचकांना वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांची ओढ लावणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मतकरी यांना काही दिवस थकवा जाणवत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मतकरी यांना कोव्हीड १९ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण तिथेच त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांच वय ८१ वर्ष होते.
वयाच्या सतराव्या वर्षी, १९५५ साली मतकरी यांनी लिहलेली वेडी माणसं ही एकांकिका मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली. तेव्हापासून सुरू झालेली मतकरी यांची भटकंती आतापर्यंत चालू होती. अश्वमेध, दुभंग, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवंय, खोल खोल पाणी, इंदिरा या मतकरींच्या नाटकांनी मराठी रसिकांची दाद मिळवली होती. त्यांनी लिहलेली लोककथा ७८ अजूनही मराठी वाचकांच्या स्मरणात आहे. बाल साहित्यातही मतकरी यांनी छाप पाडली होती. अलीकडच्या काळातील अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस या बाल नाट्यासह महाभारतावर आधारित आरण्यक नाटकाने रंगभूमीवर वेगळा आयाम रचला होता.
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक, समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.