अंबरनाथ शहराला दिशा देणारी सकारात्मक कारकिर्द

नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर व्यक्त केल्या भावना

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या विद्यामान नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर अडीच वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर येत्या सोमवारी पदावरून पायउतार होत आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अंबरनाथमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनीषा वाळेकर यांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून काम करताना अतिशय महत्त्वाचे निर्णय घेत अंबरनाथच्या विकासाला सकारात्मक दिशा दिली. सर्वांंशी हसतमुखपणे संवाद साधत त्यांनी विरोधकांना मनाने जिंकले. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत ‘विरोध’ औषधापुरताही शिल्लक राहिला नाही. नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आणि अंबरनाथ शहराचा विकास एका चांगल्या वळणावर येऊन ठेपला. शहरातील इतर राजकीय पक्षांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता शहर विकासासाठी त्यांना साथ दिली. त्यामुळेच नगराध्यक्षपद स्वीकारताना मनात योजलेले अनेक संकल्प पूर्ण करू शकले, अशी कृतज्ञ भावना वाळेकर यांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षपदाची कारकीर्द जरी अडीच वर्षांची असली तरी मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे त्याकाळात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे फारसे निर्णय घेता आले नाहीत. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात करोना संचारबंदीमुळे सुमारे दीड महिना शहर विकासाचे काही निर्णय घेता आले नाहीत, तरीही जो काही कालावधी मिळाला, तो सार्थकी लावून मनीषा वाळेकर यांनी शहर विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
मनीषा वाळेकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात मार्गी लागलेला सर्वात ठळक प्रकल्प म्हणजे रस्त्यांचे काँक्रिटीकरण. अंबरनाथमधील रस्ते हा कायम चिंतेचा विषय होता. मात्र गेल्या अडीच वर्षात शहराच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांमध्ये बहुतेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण मार्गी लागले आहे. अनेक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्णही झाली आहेत. पूर्वेकडील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लोकनगरी पूल ते गोविंदतीर्थ पूल बायपास रस्त्याचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे वडवली विभागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे.
कचरा व्यवस्थापन हा सर्वच शहरांना भेडसाविणारा विषय आहे. अंबरनाथ नगरपालिकेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने स्पेनमधील कंपनीशी करार करीत त्यांचे तंत्रज्ञान येथील कचरा व्यवस्थापनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात अंबरनाथकरांना कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या भेडसावणार नाही.
अंबरनाथ ही एक सांस्कृतिक नगरी आहे. या शहरात फार पूर्वीपासून खुल्या नाट्यगृहांच्या व्यासपीठांवर विविध कार्यक्रम होत असतात. मात्र ठाणे, डोंंबिवली आणि कल्याणप्रमाणे अंबरनाथमध्येही एक बंदिस्त नाट्यगृह व्हावे, अशी अंबरनाथकरांची मागणी होती. मनीषा वाळेकर यांच्या कारकिर्दीत ही मागणी पूर्ण झाली असून पश्चिम विभागात सर्कस मैदानात अद्यायावत नाट्यगृह साकारले जाणार आहे.
‘अ’ वर्ग नगरपालिका असा लौकिक असणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या, भव्य प्रशासकीय इमारतीचे कामही गेल्या दोन वर्षात मार्गी लागले. प्रशासकीय इमारतीचे साठ टक्क््यांहून अधिक काम पूर्ण झाले असून येत्या सहा महिन्यात या इमारतीतून पालिकेचे कामकाज सुरू होऊ शकेल, असा विश्वाास मावळत्या नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथमध्ये असलेल्या शूटींग रेंज प्रकल्पाचा जीर्णोद्धार त्यांच्या काळात करण्यात आला. मुंबई आणि पुण्यानंतर त्या दर्जाची शूटींग रेंज सध्या राज्यात फक्त अंबरनाथमध्ये आहे, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

स्वच्छतेत अव्वल
अंबरनाथ शहरात सुमारे सत्तर टक्के झोपडपट्टी विभाग आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविणे पालिका प्रशासनापुढे खूप मोठे आव्हान होते. मात्र नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, तत्कालिन मुख्याधिकारी देविदास पवार आणि इतर पालिका अधिकाऱ्यांच्या अखंड परिश्रमामुळे ते आव्हान प्रशासनाने लिलया पेलले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्वच्छतेच्या सत्त्वपरीक्षेत अंबरनाथ केवळ उत्तीर्ण नव्हे तर गुणवत्ता यादीत आले. अंबरनाथने स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यात पाचवा तर देशात तिसावा क्रमांक मिळविला.

अल्पदरात भोजन, औषधोपचार
अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात कष्टकरी समाज राहतो. त्यापैकी अनेकांना दिवसभर कष्ट करूनही दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही. या गोरगरीबांना एकवेळचे तरी सकस जेवण मिळावे, या हेतूने मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील पश्चिम विभागात गावदेवी मंदिर परिसरात दहा रूपयात जेवण हा उपक्रम गेल्या मे महिन्यापासून सुरू करण्यात आला. राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेत शिवभोजन योजना राबवली. अतिवृष्टी तसेच आता करोना संकट काळात या योजनेचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पश्चिम विभागातील भास्करनगरमध्ये अल्पदरात दवाखाना पालिकेच्या बहुउद्देशीय वास्तूत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोरगरीबांना आरोग्य सुविधा मिळू लागल्या आहेत. हे सर्व मनीषा वाळेकर नगराध्यक्षा असताना घडले.

सांस्कृतिक कार्यक्रम
शहरात ठिकठिकाणी मुलांसाठी अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग नगराध्यक्षांनी आयोजित केले. अंबरनाथ सौ, सुदृढ बालक अशा अभिनव स्पर्धा, अनुराधा प्रभूदेसाई यांचे ‘कारगिल शौर्यगाथा’ हे दृकश्राव्य व्याख्यान, प्राचीन शिवमंदिराच्या अभ्यासिका डॉ. कुमुद कानिटकर यांचा पालिकेच्या वतीने नागरी सत्कार, पुस्तक प्रदर्शन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आदी अनेक कार्यक्रम मनीषा वाळेकर यांनी त्यांच्या काळात यशस्वीपणे आयोजित केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, इतर पक्षांचे पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या पत्रकार आणि शहरातील सन्माननीय नागरिक यांच्या सहकार्यानेच मी नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम करू शकले. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पती अरविंद वाळेकर राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यांच्या अनुभवाचा मला निश्चितच फायदा झाला. तसेच मुलगा निखील सावलीप्रमाणे कायम माझ्या सोबत राहिला. दीर राजू वाळेकर यांचेही मार्गदर्शन मिळत राहिले. याकाळात ही बाहेर असल्याने घरची जबाबदारी माझ्या जाऊबाई, सून आणि इतर सदस्यांनी वाटून घेतली. या सर्वांचे मी आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहणेच मला आवडेल असे नगराध्यक्षा मनीषा वाळेकर म्हणाल्या.

 1,313 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.