माझी आई …पद्माताई…

ज्येष्ठ लेखिका आणि वनौषधी विषयातील तज्ज्ञ पद्माताई खांबेटे यांचे नुकतेच निधन झाले. लेखिका संपदा वागळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचा हा लेख खास व्हीजन एक्स्प्रेसच्या वाचकांसाठी

साधारण दीड महिन्यापूर्वीची गोष्ट. पद्माताईंचा मला फोन आला.म्हणाल्या,”सध्याच्या करोना सदृश्य लक्षणांवर आपल्या अमृतबिंदू गोळ्या उपयोगी पडाव्यात असं वाटतं…माझ्याकडे १५-२० बाटल्या तयार आहेत.कोणाला तरी घरी पाठवता आलं तर मी त्या कट्ट्यावर पाठवून देते…त्याबरोबर हे औषध कसं करायचं त्याची सोप्पी कृतीही एका कागदावर लिहून त्याच्याही १०-१२ झेरॉक्स पाठवते…”जरा थांबून पुढे म्हणाल्या,”आत्ता माझ्यात ताकद नाहीये म्हणून …जरा शक्ती आली की सामान मागवून पुन्हा करेन मग सगळ्यानाच वाटता येतील.”
पद्माताईंनी पाठवलेल्या गोळ्या आणि त्यांची कृती आम्ही कट्ट्यावर वाटली पण मला नाही वाटत की कुणी त्या बनवण्याचे कष्ट घेतले असतील. कारण पद्माताईंकडून रेडिमेड औषधं घेण्याची आम्हाला सवयच झाली होती.
सर्व प्रकारच्या दुखण्यावर लागू पडणाऱ्या अमृतबिंदूंचा तर आम्हाला प्रवासात मोठा आधार वाटे. त्यामुळे कट्ट्यावरील कोणी बाहेरगावी निघालं की हक्काने अमृतबिंदूची मागणी व्हायची आणि लगेच पुढच्या बुधवारी कट्ट्यावर या हट्टाची पूर्तता होत असे.
खरं तर पद्माताईंचं ‘वसुंधरेचा औषधी ठेवा हे पुस्तक आणि त्याची ‘नेचर्स मेडिसीनल ट्रेझर’ ही इंग्रजी आवृत्ती… दोन्ही आमच्याकडे आहेत. पण चालताबोलता औषधकोश फोनच्या हाकेवर असताना पुस्तकातील पानात डोकवायचे कष्ट कोण घेणार ? तोंडाची चव गेलीय…उचकी थांबत नाहीये इथपासून गर्भधारणा होण्यापर्यंतच्या सर्व प्रश्नांवर त्यांच्याकडे उपाय होते.
‘होते’ हे क्रियापद लिहिताना माझ्या पापण्या ओलावताहेत. कारण ज्ञानाच्या या एनसायक्लोपीडियाने ध्यानीमनी नसताना (७ मे २०२०) पृथ्वीतलावरून एक्झिट घेतली.
काही जणांचा वावर एवढा उत्साही, आनंदी असतो की ते कधी आपल्याला सोडून जातील अशी कल्पनाही मनाला शिवत नाही. म्हणूनच ‘पद्माताई आता आपल्यात नाहीत’ या गोष्टीवर विश्वाास ठेवणं कठीण जातंय.
कट्ट्याच्या आम्हा साधारणपणे ६० ते ७० वयोगटातील कार्यकर्त्यांमध्ये पद्माताई सर्वात ज्येष्ठ. तरीही आत्ताच्या महिलादिनापर्यंत दर बुधवारी कट्ट्यावर येण्याचा (तेही वेळेआधी ) त्यांचा नेम कधी चुकला नाही. पहिल्या रांगेतील उजवीकडील त्यांची जागाही ठरलेली. कट्ट्याच्या अविनाशवर त्यांचं नातवासारखं प्रेम. तोही त्याच भावनेतून त्यांना जपत असे…जाताना रिक्षात अलगद बसवून देत असे. कट्ट्यावर मुख्य कार्यक्रमाआधी १५-२० मिनिटं सर्वांना बोलण्यासाठी खुली असतात, तेव्हा श्रोत्यांचे कान पद्माताईंकडून घरगुती औषधं ,झटपट रेसिपी इ.ऐकण्यासाठी उत्सुक असत. एखादा विशेष कार्यक्रम झाला की बक्षीस देण्यासाठी त्यांचा हात सर्वप्रथम पर्समध्ये जाई. स्वत:च्या आणि अप्पांच्या वाढदिवसाला कट्ट्याला हजार रुपयांची देणगी देण्याचा त्यांचा नेम आजवर चुकलेला नाही. त्यांचं हे कट्ट्यावरचं प्रेम बघून त्यांच्या नातवाने नंदनने आजीच्या गेल्या वाढदिवसाला कट्ट्याला दहा हजार रुपयांची देणगी देऊन त्यांच्यासह आम्हाला सुखद धक्का दिला.
माझी तर ती आईच होती. त्यांची लेक वीणा ही माझी बँकेतील मैत्रीण. तिच्या अकाली जाण्यातून त्यांचे आणि माझे बंध जुळले. माझ्या एवढया तेवढ्या गोष्टीचं त्यांना कोण कौतुक. २०१५ मध्ये लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतून ‘सत्पात्री दान ‘हे सदर लिहीत असताना मी अहमदनगर येथील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ या बेघर, अनाथ व मनोरुग्ण स्त्रियांना प्रेमाने सांभाळणाऱ्या संस्थेशी जोडली गेले. या देवकार्यासाठी निधी उभारावा असं माझ्या मनाने घेतलं. हा विचार जेव्हा मी पद्माताईंजवळ बोलून दाखवला त्या क्षणाला त्यांचे शब्द होते,”या कामासाठी पहिले माझे एक लाख रूपये घे आणि पुढे हो. देव तुझ्या पाठीशी उभा राहील…”आणि खरंच त्यांच्या आशीर्वादामुळे एक करोड रूपयांची मदत उभारण्याची वेस आम्हाला ओलांडता आली.
त्यांचं प्रेम अनेक मार्गांनी व्यक्त व्हायचं. एकदा त्यांच्याकडे ‘निद्रा मॅट्रेसेस’चा विक्रेता आला. विशिष्ट तापमानात वाढवलेल्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवल्यामुळे पाठकण्याला सुखावह झालेली ती गादी अप्पा आणि पद्माताईना एवढी आवडली की त्यांनी प्रत्येकी साडे बारा हजार रुपयांच्या पाच गादया व उशांची ऑर्डर तिथल्या तिथे देऊन टाकली.(चार घरच्यांसाठी आणि एक माझ्यासाठी ) त्या गादीमुळे व त्यापाठच्या प्रेमामुळे माझं मणक्याचं दुखणं कुठच्या कुठे पळालंय…रोज झोपताना मी आईच्या कुशीत शिरतेय असा भास होतो. झालंस तर त्यांनी मायेने दिलेली त्यांच्या पेणच्या फार्महाऊसमधील काळ्या हळदीची अत्यंत गुणकारी,दैवी मुळी माझी सतत पाठराखण करत असते.
गेल्या वर्षभरापासून पद्माताईंनी कट्ट्याखेरीज बाहेर पडणं बंद केल्याने मी व माझी मैत्रीण सुलभा आम्ही दोघीनी महिन्यातून एकदा त्यांच्या घरी जाण्याचा नेम केला.आमच्या प्रत्येक भेटीच्या वेळी कोणती ना कोणती खास डिश ‘ओळखा पाहू ‘हे लेबल लावून सज्ज असायची.उदा.शेपूचे कटलेट्स, तुळशीच्या बियांचे लाडू … असं काही ना काही हटके ! त्याबरोबर आम्हाला शिकविण्यासाठी एखाद्याा पदार्थाची तयारी केलेली असे…पंचामृती केक किंवा मायक्रोवेव्ह स्पेशल रोस्टेड बटाटे किंवा खारे दाणे असं काहीतरी.खरं तर आमचा उत्साह वा !वा ! म्हणत समोरच्या पदार्थावर ताव मारण्यापुरताच असणार हे माहीत असूनही त्यांच्या शिकवण्याच्या उत्साहात तसूभरही फरक पडत नसे. निघताना घरगुती लोणचं, घरीच कुटलेली सुपारी, दारच्या आवळ्यांचं सरबत… अशा माहेरच्या भेटींनी आमची पिशवी जड होत असे. दोन तास गप्पा मारुन निघाल्यावर लिफ्टच्या दाराशी यांचा नेहमीचा पोटात कालवणारा प्रश्न…”पुढच्या वेळेला जरा जास्त वेळ काढून याल ना ?”
स्वयंपाकातील किचकट पाककृतींसाठी शॉर्टकट शोधावा तो पद्माताईंनीच ! उदा. पुरणपोळी करताना पुरण शिजलं की गूळ घालायच्या आधीच वाटून घ्यायचं म्हणजे निम्मे श्रम कमी होतात…यात एक उपटीप म्हणजे या पुरणात थोडा खवा मिसळला तर खातेही रह जाओगे…बेसनलाडू करताना पिठाऐवजी डाळं घेतलं तर लाडू पटकन होतात इ…त्यांच्या पाठपुराव्यामुळे सत्तूचं पीठ, ढोकळ्यापासून डोशांपर्यंत काहीही बनवता येईल असं तांदूळ-डाळींचं पीठ, कढीपत्याची चटणी, सकाळी उठल्याउठल्या प्राशन करण्यासाठी सुवर्णजल…अशा काही मूलभूत प्रक्रीया का होईना… मला आत्मसात करता आल्या हे माझं भाग्य ! मात्र त्यांच्या ज्ञानाचा वारसा त्यांची सून गीता यशस्वीपणे पुढे नेतेय हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं !
बिघडलेल्या पदार्थाना ताळ्यावर आणण्यासाठी पद्माताईंकडे भरपूर युक्त्या होत्या. एका दिवाळीत बेसनलाडू करताना मी खमंग भाजलेल्या बेसनात नजरचुकीने पिठीसाखरेऐवजी मैदा मिसळला आणि चव घेतल्यावर रडकुंडीला आले. माझ्या या समस्येवर त्यांचा सल्ला होता,”थोडं तूप टाकून पुन्हा भाजून घे सगळं आणि मग पिठीसाखर मिसळून लाडू वळ…”या प्रक्रियेतून ‘बेसन-मैदा लाडू ‘ही नवी पाककृती जन्माला आली. पुढची गंमत म्हणजे हा अनुभव लोकसत्तात पाठवल्यावर अशा अनुभवांची एक मालिकाच ‘घडलंय- बिघडलंय ‘या नावाने सुरु झाली, जिला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
‘सकाळी त्याग केल्यावरच आपण भोग घेऊ शकतो आणि हे करण्यासाठी योग हवाच ‘हे त्यांचं वाक्य आम्ही मनावर कोरुन ठेवलंय. नियमित योगासनं व प्राणायाम हे पद्माताई व अप्पा यांचं बलस्थान. ८५ वर्षांच्या पद्मााताई ज्या सहजतेने सर्वांगासन घालत ते पहाताना आमचा आ वासलेला राही. सुजोग थेरपी आणि आजीबाईचा बटवा या शिदोरीवर पॅरालिसिस झालेल्या अप्पांना (ज्यांना करंगळीही हलवता येत नव्हती) ताठ उभं करणाऱ्या पद्माताईना स्वत:च्या दुखण्याची (लिव्हर कॅन्सर ) कल्पना आली नसेल ? पण वयाच्या या टप्प्यावर कोणतेही वेदनादायी उपचार घेऊन आयुष्य वाढवायचं नाही, या मुद्द्यावर दोघंही ठाम राहिली. परिणामी ‘जेवण जात नाही’ एवढं एकच लक्षण दिसणाऱ्या पद्मााताईंचं जीवन एखाद्याा फुलाने देठापासून गळून पडावं इतक्या सहजतेने अनंतात विलीन झालं. माझी आई गेल्यानंतर चार वर्षांनी मी पुन्हा एकदा पोरकी झाले.
पद्माताईंमध्ये मला नेहमीच दुर्गेचं रुप दिसत असे.
महालक्ष्मी, महासरस्वती आणि प्रसंगी महाकाली या तिन्ही शक्ती त्यांच्यात होत्या. म्हणून नुकत्याच झालेल्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने माझी ही प्रार्थना…

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।

 875 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.