कमी तेथे शिक्षक… आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ शिक्षक कोरोनाविरुद्धच्या लढ्यात

कोरोना टेस्टसाठी स्वॅब सॅम्पल घेण्याची स्वीकारली जबाबदारी
बदलापूर : शासनाची कोणतीही मोहीम आली कि त्यात शिक्षक नाही से कधी होत नाही. मग जनगणना असो, मतदार नोंदणी असो कि मतदार स्लिप वाटणे असो कोणतेही काम हे शिक्षकांना करावेच लागते. आता कोरोनाच्या या लढाईमध्येही शिक्षक मागे राहिलेला नाही. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, रुग्णालय कर्मचारी यांनाच कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. अशा वेळी कमी तेथे आम्ही या प्रमाणे बदलापुर मध्ये रहाणारे एक शिक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करीत असून त्यांनी कोरोना टेस्टसाठी स्वॅब सॅम्पल घेण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.
बदलापुरात राहणारे व अंबरनाथच्या शास्त्री हिंदी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष दुबे हे बदलापूर पालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात स्वॅब सॅम्पल घेण्याचे काम करीत आहेत. मार्च महिन्यात संचार बंदी जाहीर करण्यात आली. कोरोना विषाणूच्या युद्धात डॉक्टर, परिचारिका पोलीस असे अनेक कोरोना वॉरियर्स सहभागी झाले. त्यामुळे शाळेत ज्ञानार्जनाचे काम करत असताना आपल्या देशाप्रती, समाजाप्रती आदर भाव व्यक्त करताना आपणही या कार्यात भाग घ्यावा या उद्देशाने संतोष दुबे हेही या युद्धात हिरारीने सहभागी झाले. त्यांचे बीएससी डी एम एल टी पर्यंतचे शिक्षण त्यांना याकामी कामी आले. त्यांनी कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्याचे जोखमीचे काम मोठ्या जबाबदारीने स्वीकारले. बदलापूर पालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. पालिके मार्फत आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी १५६ जणांचे स्वॅब सॅम्पल निगेटिव्ह आलेले आहेत तर 21 जणांचे स्वॅब सॅम्पल रिपोर्ट सध्या प्रतीक्षेत आहेत.
स्वॅप सॅम्पल कलेक्ट करणे हे काम मोठ्या जोखमीचे असल्याने संतोष दुबे यांना आपल्या कुटुंबापासून वेगळे राहावे लागते. त्यांना बारा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी आहे परंतु आपण करत असलेले काम जोखमीचे असल्याने ते त्यांच्यापासून वेगळे राहात आहेत. समाजाप्रती आपले ऋणानुबंध जोपासना करता त्यांनी हा विरह ही मोठ्या आनंदाने स्वीकारला आहे. संतोष दुबे यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. संतोष दुबे यांचे शहरात कौतुक होत आहे.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.