बदलणार आहे सारेच आहोत का आपण तयार? – श्रीपाद भालेराव

जगात काही घटना अशा आहेत की ज्याने पूर्ण जगरहाटी बदलून जाते.

दुसरे महायुद्ध ही एक अशी घटना, संगणक तंत्रज्ञान इंटरनेट चे शोध ही अजून एक, 9/11 चा हल्ला ही पण त्यातलीच.

आणि आता कोव्हिड 19 च्या महामारीने लाखभर लोकांचा मृत्यू आणि 14 लाखाच्या वर लोकांना झालेली लागण.

संपूर्ण जगाचे व्यवहार जवळ जवळ ठप्प झालेले. गरीब श्रीमंत वगैरे सर्व भेद गळून पडले आहेत. प्रत्येक जण फक्त आपल्या जिवाच्या भीतीने आपापल्या घरात कोंडून बसला आहे.

अनेक जण याला तात्पुरता प्रश्न आहे नंतर सगळं व्यवस्थित होईल अशा प्रकारे भाबडा आशावाद करीत आहेत. अनेज यंत्रणा आताच्या परिस्थितीवर कसे नियंत्रण येईल यासाठी अहोरात्र कामाला लागल्या आहेत.

जगातील आर्थिक उलाढालीयच्या आणि त्यामुळे दाट लोकवस्ती असणाऱ्या मेगासीटी यात प्रामुख्याने जास्त प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आलेल्या आहेत.

आर्थिक मंदी, अनेक कंपन्यांचे ले ऑफ, पगार कपात, अनेक सेवा उद्योगांचे कदाचित बंद पडणे, औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्र डबघाईला येणे असा दूरगामी परिणाम या नंतर दिसेलच.

त्यावर मात करताना आधीच भीतीच्या तणावग्रस्त परिस्थितीतून आर्थिक दुरवस्थेत अनेक कुटुंबे जाण्याची शक्यता आहे.

या असुरक्षिततेच्या भावनेतून मध्यमवर्ग जास्त आपमतलबी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून निम्न आर्थिक स्तरातील लोक हतबल होऊन काही ठिकाणी याचा परिपाक अराजक माजून सिव्हिल वॉर होऊ शकते.

आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका कला क्षेत्रातील लोकांना बसणार आहे कारण ते सर्व सर्व्हायवल किट चा भाग नसते.

शिक्षण क्षेत्रातील महागडे कोर्स लोकांना परवडेनासे झाले तर ते क्षेत्रही प्रभावित होईल
एकूणात खूप जास्त मोठा परिणाम या सर्वांचा पुढील अनेक वर्ष जगावर होणार आहे.

या सर्वांची चाहूल जर अजूनही आपल्याला लागली नसेल तर आपण खुशाल मिळालेल्या सुटीत मी कसा स्वैपाक करतोय आणि कशी मज्जा करतोय वगैरेवर तासन तास घालवू शकतो आणि जर हे सावट आपल्या दारात दबा धरून बसलय आणि ते या कोरोनावर नियंत्रण आल्यानंतर आपल्यावर कोसळणार आहे.

मग अशात सर्वात पहिले जर काही आपल्याला करणे शक्य असेल तर गरजा कमी करणे. ज्याची सवय आपल्याला आपोआप गेल्या चार आठवड्यात लॉक डाउन मुळे लागली आहे.

दुसरे म्हणजे आपल्यासाठी काहीतरी प्लान B चा विचार सुरू करणे. जर आपण नोकरी व्यवसाय करत असलेल्या क्षेत्रात मंदी आली आणि त्याचा परिणाम आपल्या कामाच्या स्वरूपावर आणि पगारावर झाला तर आपले काय नियोजन असेल आणि आपल्याकडे काय पर्याय उपलब्ध असू शकतील?

तिसरे म्हणजे औपचारिक शिक्षणासोबत आपण आपल्या मुलांना बदललेल्या परिस्थितीत जगण्यासाठी कोणते स्किल्स शिकवू शकतो यावर विचार करायला सुरुवात करणे.

शेती , वस्त्र, निवारा हेच पुन्हा सर्वात महत्वाचे होईल आणि इतर उद्योग कदाचित बॅक सीट वर जातील. नक्की कसे काय होईल हे नाही आता सांगता नाही येणार पण बदल नक्कीच होणार.

आजच्या डिजिटल युगाची मुळे दुसऱ्या महायुद्धात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी लागलेल्या शोधात सापडतात रडार मुळे TV, आणि पुढे दूरसंचार क्षेत्रातील प्रगती, पेनिसिलिन मुले औषध निर्माणातील प्रगती असे अनेक दाखले देता येतील.

पण गेल्या पंचवीस वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि सर्व बुद्धीमत्ता त्याच दिशेने लागल्याने मुलभूत संशोधनाकडे जरासे दुर्लक्ष झाल्याचे आज नक्कीच जाणवते आहे.

कोरोना हा व्हायरस आधी अस्तित्वात होता आणि कोव्हिड 19 त्याचे म्युटेशन इतके बेसिक माझ्या आकलनात आले आहे पण मग आधीपासून असणाऱ्या कोरोनावर तरी लस आहे का की ते संशोधन झालेच नाहीये? (मी असा दावा करीत नाहीये कारण मी त्या क्षेत्रातील तज्ञ नाही)आणि नसेल तर का झाले नाही
रोज नवनवे मोबाईल आणि त्यातील फीचर्स यातच जगाची जास्तीत जास्त बुद्धी लागली होती का?
यावर नक्की विचार व्हायला हवा.

तंत्रज्ञानाला विरोध करण्याचा मुळीच मानस नाही ते हवेच पण मुलभूत संशोधनही तितकेच म्हटवाचे आहे ना मानव जातीच्या सुकर आणि सुरक्षित जगण्यासाठी.

अजून एक मोठा आघात आपणा सर्वांच्या विचारांवर कायमचा असेल तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे आपण पुढील काही दिवस संशयाने आणि अविश्वासाने पाहणार आहोत. न जाणो त्याला संसर्ग असेल तर मलाही होईल ही संशय युक्त भीती बाहेर वावरताना असणारच आहे
त्यामुळे सुरक्षेच्या कारणाने बंदिस्त जीवन जगू लागणार बहुतेक आपण.

हे सर्व इतके आणि इतक्या जलद बदलणार आहे की जगाची देशाची राजकीय आणि आर्थिक समीकरणे आमूलाग्र बदलतील. ,”,इथे मला आपणच आता महासत्ता वगैरे सेन्सेशनल दावा बिलकुल करायचा नाहीये “

उलट परस्पर अवलंबित्व अनेक देशांचे वाढीस लागेल आणि तिथे जे देश संवेदनशील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील (भावनातिरेकाचा बळी न पडता) ते देश लोकांच्या मूलभूत गरजा लवकर भागवू लागतील.

आणि या सर्व मुद्यांवर वेगवेगळ्या क्षेत्रातील एक्स्पर्ट नी विचार सुरू करावा म्हणून मी माझ्या अल्पमतीला जे जाणवत आहे ते इथे मांडतोय. इथेच यावर आपले मुद्दे कमेंट मध्ये जरूर मांडा जे आपल्याला काही सकारात्मक दिशा शोधण्यासाठी उपयोगी पडतील.

शेवटी मी ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्यातल्या गृहनिर्माण प्रकारातील 30 40 वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या 4 मजली इमारती, त्याही पूर्वीच्या चाळी, आणि आताच्या बहुमजली इमारती ज्यांना हल्ली बाल्कनी नावाचा सुंदर प्रकारही नाही अशा सर्व घरात राहाणाऱ्या लोकांपैकी लॉक डाउन काळात कोणत्या प्रकारच्या घरातील लोक आपापल्या घरातून इतरांशी बोलू शकत आहेत (प्रत्यक्ष झूम स्काईप वगैरे न वापरता) ?

खरच नवी घरे सोशल कनेक्ट चा विचार करून डिजाईन केली गेली आहेत का? का आपण लाखो लोखंडी ग्रील असलेले पिंजरेच तयार करत बसलो यावर फक्त आर्किटेक्ट्स नी नाही तर संपूर्ण गृहानिर्माणात असलेल्या लोकांनी विचार करावा.

आता short term गोल असलेल्या अनेक वेगवेगळ्या राजकीय विचारधारा मानणाऱ्या माझ्या मित्रासाठी कळकळीची विनंती तुम्ही खरच खूप हुशार आहात ते तुमच्या मुद्देसूद पोस्ट्स वरून ध्यानात येते आणि त्यामुळेच तुम्ही सोशल मीडिया influencer च्या भूमिकेत असता हे तुम्हालाही माहीत आहेच.

फक्त आता संपूर्ण समाज, देश आणि जग हे खूप मोठया संकटात आहे. आणि त्याचे long term effects खरच खूप वेगळे असतील जे कदाचित तुमच्याही राजकारणाची दिशा ठरवतील/बदलतील
त्यामुळे मी हात जोडून एक विनंती करतो की ठेवूया सर्व भेदाभेद बाजूला आणि करूया का एकत्रित विचार आणि सामना संकटाचा?

लिहूया का आपल्याला जे सुचतील ते मुद्दे , “possibilities and probable solutions in various aspects of mankind post corona” असा एक जॉईंट कोलॅबोरेशन ने पेपर तयार करूया का
मग त्यात तुमचे तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर, वैज्ञानिक, कला, क्रीडा, इत्यादी इत्यादी प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आणि दूरदृष्टी कामाला लावा.

कदाचित आपण एक समूह म्हणून काही मांडू जगासमोर सरकार समोर लोकांसमोर
करूया का सुरुवात ?

जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर खाली कमेंट मध्ये ” मी तयार आहे” असे लिहून त्यापुढे आपण कोणत्या क्षेत्रातील आहात आणि आपले नाव इतकेच पुढील दोन दिवसात लिहा.

सर्वांची नावे आली की आपण एक फेबु पेज तयार करू आणि त्यावर आपले लिखाण सुरू करू

काय मग येता का सोबत
(पहिली मदत वरील लेख इंग्रजी मध्ये कोणी करू शकणार असेल तर हवी आहे त्याने अधिक लोकांपर्यत पोचता येईल)

श्रीपाद भालेराव
रचना संसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक
स्वत्व या संस्थेचे सहसंस्थापक
कला, संगीत, संस्कृती आणि पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक भान निर्माण करण्यासाठी गेली 15 वर्ष कार्यरत

 649 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.