परराज्यातील मजुरांची राष्ट्रवादी काँग्रेसने केली क्षुधाशांती

चालत आपल्या मूळ गावी जाणाऱ्या मजुरांना दिला आधार

ठाणे : डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने तळपायाखालचा रस्ताही प्रचंड तापलेला आहे. अशा स्थितीमध्येही हाताचे काम गेल्यामुळे खिशात दमडीही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे वाहनांतून गावीही देखील जाता येत नाही. परिणामी, उपाशीपोटी चालत जाण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. अशा मजुरांची क्षुधाशांती करण्याचे व्रत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नियोजनानुसार माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंगीकारले आहे. नाशिक हायवेवरील खारीगाव टोल नाका ते माणकोली नाका दरम्यान ते आपल्या कार्यकर्त्यांसह दिवसभर थांबून जाणार्‍या प्रत्येक मजुराला अल्पोपहार आणि पाण्याचा पुरवठा करीत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. व्यवहार ठप्प आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि अन्य प्रांतातील अनेक मजूर लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक जिह्यांत अडकून पडले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मजूरही जिल्हाबंदी मुळे मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये लॉकडाऊन आहेत. या मजूरांना हाताला काम नाही आणि हाती असलेले पैसे पण संपले आहेत. अशा स्थितीत हे मजूर आपल्या मूळगावी चालतच निघाले आहेत. या मजुरांसोबत त्यांचा कुटुंबकबिलाही आहे. लहान मुले सोबत असल्याने त्यांची प्रचंड परवड होत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मिलींद पाटील, मा. नगरसेविका मनाली पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, अरविंद मोरे, साक्षी मिलींद पाटील यांनी ठाणे- मुंबईतून जाणार्‍या खारीगाव टोलनाका गाठून या भागातून जाणार्‍या मजुरांना पाणी, बिस्कीटे, फळे यांचे वाटप केले. तसेच, काही मजूर हे भिवंडीतून येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट माणकोली नाका गाठून तेथे उपस्थित असलेल्या मजुरांनाही अल्पोपहाराचे वाटप केले.
या संदर्भात मिलींद पाटील यांनी सांगितले की, गेले अनेक दिवस काही मजूर पायी तर काही शासनाने सुरु केलेल्या एसटी बसने आपल्या मूळगावी जात आहेत. मात्र, रस्त्यामध्ये हॉटेल्स-धाबे बंद असल्याने या मजुरांची उपासमार होत आहे. त्यामुळेच डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही अल्पपोहाराचे वाटप करीत आहोत. हा उपक्रम आम्ही जोपर्यंत सर्व मजूर त्यांच्या मूळगावी परतत नाहीत; तोपर्यंत अविरतपणे सुरु ठेवणार आहोत.

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.