जिल्ह्यातील रुग्णांना बेड कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे


एकनाथ शिंदे यांनी केली पहाणी : १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु
बदलापूर : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे हे लक्षात घेऊन जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सूर करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना बेड मिळाला नाही अशी तक्रार येऊ नये यासाठी शक्यती सर्व खबरदारी शासनाकडून घेण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णांना बेड कमी पडू दिले जाणार नाही. त्याच प्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था करण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने, बदलापूर पालिका, ठाणे जिल्हा रुग्णालय आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापुर मध्ये १२० बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी वरील माहिती दिली.
यावेळी आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष एड. प्रियेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश, तहसीलदार जयराज देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, शिवसेना गटनेते श्रीधर पाटील, मुकुंद भोईर, संजय गायकवाड, प्रभू पाटील यांच्यासह नगर परिषदेतील नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. हा सोहळा औपचारिक रित्या पार पडला. कोणतेही स्वागत वा सभेचे स्वरूप या कार्यक्रमात नव्हते. पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बदलापूर नगर परिषद व ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून १२० बेडचे हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी वामन म्हात्रे व त्यांच्या टीमने इतर आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून दिली असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार या सेंटरची क्षमता ५०० ते ६०० बेडपर्यंत वाढवण्यात येईल. बेड अभावी कोरोना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ४००, ५००, ७५०,१००० बेडचे केअर सेंटर उभारून ५ हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाहीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कल्याण डोंबिवली तसेच अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेने घेतलेला निर्णय मागे घेण्यात आल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. याबाबत शासनाकडून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागेल. हि व्यवस्था झाल्यावर त्या कर्मचाऱ्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचेल आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबरच नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. असे निर्णय एकदम घेता येत नाहीत असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेत मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था झाली तर त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रादुर्भावही टाळता येईल, त्यामुळे याबाबत मुंबई महापालिकेला विनंती करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या स्वाब तपासण्यासाठी ठाणे जिल्ह्यात आणखीही सुविधा करण्यात येईल जेणे करून सध्या तपासणी आणि त्याचा अहवाल येणास बराच कालावधी लागत आहे तो कालावधी वाचून नागरिकांच्या मनावरील ताण कमी होईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनाबरोबर सर्व यंत्रणा आणि नागरिकांचा सहभाग लाभत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. असेच सहकार्य आणखी मोठ्या प्रमाणात लागेल यासाठी नागरिकांनी शासनास सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 405 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.