सामाजिक अंतर राखून पर्यावरण आराखड्यातील कामे सुरू : रोजगारासह पर्यावरण रक्षण
मुरबाड : एकीकडे सारे जग कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उभ्या राहिलेल्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक, राजकीय आव्हानांना कसे तोंड द्यायचे असा विचार करीत असताना जगण्यासाठी नेहमीच संघर्ष कराव्या लागणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी वसुंधरा दिनाच्या मुहुर्तावर बेरोजगारीच्या चिंता दूर करून पर्यावरण संवर्धन आराखड्यातील कामांना सुरूवात केली आहे. वनहक्क धारक गावांनी वन जमिनींवर जल व मृदा संधारणाची कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावाला कामांनुसार किमान तीन लाख ते आठ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. या महिन्याअखेर पर्यंत कामे पूर्ण करण्याचा चंग या आदिवासींनी बांधला आहे. यामुळे आदिवासींना या संकटसमयी रोजगार मिळाला आहे, त्याच प्रमाणे वर्षा जलसंचयन होऊन डोंगरावर हिरवाई निर्माण होणार आहे.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. यंदा यादिवशी एकत्र येऊन कार्यक्रम करणे शक्य नव्हते. मात्र कार्यक्रमाऐवजी सध्याच्या कोरोना संचार बंदीच्या पेचातून बाहेर पडण्यासाठी थेट कृती करण्याचा निर्णय घेतला. संचार बंदीच्या सुरुवातीला महिनाभर गाव पाडयावरील आदिवासी बंधू, भगिनी आपापल्या घरात बसून होते. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे या लोकांना रोजगारासाठी कामे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र सध्याच्या बिकट परिस्थितीत शासन काहीतरी करेल, याची वाट न पाहता आपल्या हाती असलेला पर्याय वापरून रोजगार कोंडी फोडण्यासाठी तालुक्यातील सामूहिक वनहक्क धारक गावांनी वन जमिनींवर जल व मृदा संधारणाची कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावाला कामांनुसार किमान तीन लाख ते आठ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे.
मुरबाड तालुक्यातील शिसेवाडी, दिवाणपाडा, केव्हारवाडी, पेजवाडी, शिरवाडी आदी १० गावांनी तयार केलेल्या पर्यावरण संवर्धन आराखड्यांतील कामांसाठी ठाणे जिल्हा नियोजनमधून वनविभागामार्फत २०१९-२० मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र ‘कोरोना’ संकटामुळे मार्च तसेच एप्रिलच्या पहिल्या वीस दिवसात यापैकी कोणतीही कामे होऊ शकली नाहीत. आता मात्र वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन आराखड्यातील कामे तसेच जून मधील वनीकरणासाठी नर्सरी आणि बंधारे गाळमुक्त करण्यासाठी साफसफाई सुरु करण्यात आली आहे.
शिसेवाडीतील ग्रामस्थंनी घायपातीच्या नर्सरीचे काम हाती घेतले आहे. याशिवाय वनिकरणासाठी खड्डे खणणे, गॅबियन बंधारे बांधण्याचे नियोजनही करून ठेवले आहे. वणवा प्रतिबंधक जाळरेषा घेतल्या आहेत तर जंगलाच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीची कामेही काही गावे करणार आहेत. ही सर्व कामे करताना सुरक्षितता आणि सामाजिक अंतर कटाक्षाने पाळले जात आहे.
या आदिवासी गावांच्या बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगेवर असलेल्या काही डोंगरावर हि कामे सुरु आहेत. यात उतारावर चर खणले जात आहेत. जेणे करून पावसाळ्यात धो धो वाहून जाणारे पाणी बऱ्यापैकी या चरांमध्ये अडून जमिनीत पाणी जिरवले जाईल. त्याच प्रमाणे चराच्या बांध्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे उजाड असणारे हे डोंगर हिरवेगार होऊन पर्यावरण रक्षणाचे काम होणार आहे. कोरोना संचार बंदीच्या या काळात शहरात सुन्न करणारे वातावरण असताना मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधव आपल्या कुटुंबियांसमवेत शासनाची हि योजना पूर्ण करण्यासाठी सकाळी लवकर उठून मेहनत घेत आहेत. त्यात त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटून पर्यावरण रक्षण आणि वर्षा जलसंचयनाचे मोठे काम होत आहे.
जिल्ह्यावरून तसेच वन खात्याकडून काही रकम मिळाली आहे. या रकमेमधून मुरबाड तालुक्यातील दहा गावात हि कामे सुरु आहेत. कोरोनाच्या संचार बंदीच्या संकटावर मात करून, गावातल्या गावात रोजगार उपलब्ध झालेला आहे. प्रत्येक गावात पन्नास ते साठ मजूर हि कामे करीत आहेत. त्यामुळे आमच्या या बांधवाना रोजगार मिळाला असून शासनाची योजनाही त्यामुळे वेळेत पूर्ण होऊ शकत असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेचे दशरथ वाघे यांनी सांगितले.
तालुक्यातील अन्य गावांनाही अशा प्रकारे रोजगाराची कामे हवी आहेत. शिरसोनवाडीतील १४ मजुरांनी शासनाकडे काम देण्याची मागणी केली आहे. येणाऱ्या शेतीच्या हंगामासाठी बियाणे, खते, खावटी यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. या दीड महिन्यात जर रोजगार मिळाला नाही तर हा आदिवासी अल्प भूधारक शेतकरी पावसाळ्यात आपली शेती कशी करणार ? त्यामुळे इतर गावांनाही शासनाने रोजगाराची कामे मिळवून द्याावीत, अशी आमची मागणी असल्याचे श्रमी मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.
499 total views, 1 views today