वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना सर्वेक्षणाच्या कामातील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
बदलापूर : बदलापूर पालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून त्यामुळे कोरोना सर्वेक्षणाचे काम करणारे शिक्षकही धास्तवले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे विम्यासह पीपीई किटचे संरक्षण मिळण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने यासंदर्भात बदलापूर पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.
स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष काशिनाथ भोईर यांनी बदलापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कोविड १९ अंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांचे विमा सुरक्षा फॉर्म भरून घेऊन त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, शिक्षकांना पीपीई किट, हॅन्डग्लोव्ह्ज, सॅनिटायजर व वाहन व्यवस्था करण्यात यावी, जे शिक्षक गेल्या महिन्याभरापासून सतत सर्वेक्षणाचे काम करीत आहेत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याचा विचार करून त्यांना या कामातून वगळण्यात यावे. सद्यस्थितीत उन्हाळी सुटी लागलेली असल्यामुळे शिक्षकांना या कामातून सूट मिळावी, शिक्षकांना गावी जाण्यास परवानगी मिळावी, उन्हाळी सुट्टीत जे शिक्षक स्वेच्छेने काम करण्यास तयार आहेत त्यांना सुटी कालावधीची अर्जित रजा भरून मिळावी, काही कारणास्तव सर्वेक्षणास अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांचा कपात केलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त व ५० वर्षावरील शिक्षकांना सर्वेक्षणातून वगळण्यात यावे, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
बदलापुरात कोरोनाचे ६ नवे रुग्ण
बदलापुर शहरात बुधवारी (ता.१३) कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार रुग्ण बदलापूर पश्चिम तर दोन पूर्व भागात राहणारे आहेत. रुग्णांमध्ये चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.
बदलापुर शहरात आतापर्यंत कोरोनाचे ६९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. २२ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ४५ बाधितांवर पुढील उपचार सुरू आहेत.
507 total views, 1 views today