दिल्लीत यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अडकलेली १६०० मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार..

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

डोंबिवली : कल्याण – दिल्लीत यूपीएससी  स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६००  मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या  पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी दिल्ली ते भुसावळ या विशेष ट्रेनच्या प्रवासाला मान्यता दिली आहे.  दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव अभय यावलकर, राज्य शासनाचे सचिव नितीन करीर, दिल्लीतील महाराष्ट्राचे सनदी एस सहाय्य यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, या सर्वांचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले आहेत. तर आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून हा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत. दरम्यान परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी रुग्ण वाढल्याने भयभीत झालेल्या या सर्व मुलांसमवेत काल पुन्हा झूम व्हिडिओ काँफेरेन्सद्वारे संवाद साधत डॉ श्रीकांत शिंदे यांनी धीर दिला होता.येत्या शनिवारी, १६  रोजी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ही विशेष ट्रेन धावणार असून रविवार १७  रोजी  भुसावळ स्टेशन येथे पोहोचणार आहे. दरम्यानच्या प्रवासात ट्रेन महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी स्टेशनवर उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे, कल्याण आदी स्टेशनवर देखील ट्रेनला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून याची अधिकृत माहिती उद्यापर्यंत जाहीर करण्यात येईल अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.दिल्लीतील ज्या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होत आहे त्यांनी अन्नपूर्णा किचन अंतर्गत लाभ घेण्यासाठी स्वयंसेवक मुक्तेश ( +918434244444 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.