लॉकडाऊनमध्ये कॅरमचा डिमांड वाढला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी राज्य मंत्री सचिन अहिर आपला वेळ घालविण्यासाठी कॅरम खेळत आहेत. तर सिनेतारका शिल्पा शेट्टी व अभिनेते अनिल कपूरही कॅरम खेळतानाचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहे.

मुंबई : संपूर्ण जग कोरोना वायरस कोविड १९ ने ग्रासले असताना कॅरम या खेळाने मात्र बहुतांशांना दिलासा दिला आहे. २५ मार्च २०२० रोजीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर झाला आणि संपूर्ण देश एका क्षणात जिथल्या तिथे थांबला. देशातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प होऊन बसले आणि पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या चाकरमान्यांपासून ते उधोगपती, राजकारणी व सेलिब्रिटींनाही नाईलाजाने आपापल्या घरात बसण्याची पाळी आली. एरव्ही आपापल्या कामात व्यस्त असणाऱ्या या मंडळींना आपला वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला असताना विरंगुळा व टाईम पास म्हणून पाहिला जाणारा कॅरमच आज सर्वांच्या मदतीला आल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी राज्य मंत्री सचिन अहिर आपला वेळ घालविण्यासाठी कॅरम खेळत आहेत. तर सिनेतारका शिल्पा शेट्टी व अभिनेते अनिल कपूरही कॅरम खेळतानाचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहे. शिवाय सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आपल्या गावी आपल्या भावाबरोबर कॅरमचे दोन हात करत असून एरव्ही व्यस्त असणारे ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कारार्थी धनराज पिल्ले हे कॅरमच्या व्हिडीओ बघून आपला वेळ घालवत आहे. गेल्या काही दिवसात माझ्याकडे कॅरमच्या अनेक व्हिडीओ क्लिप येत असून त्यामध्ये एरव्ही कॅरमच्या स्पर्धेत कधीही न दिसणारी मंडळी ग्राफिकचा आधार घेऊन अविश्वसनीय शॉर्ट्स खेळताना दिसत आहेत. अगदी सिनेमात जश्या गाड्या उडताना आपण पाहतो त्याप्रमाणे सोंगट्या उडवून घेतानाचा ते डोळे बंद करून विविध शॉर्ट्स खेळतानाचे व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत असून त्यामुळे कॅरमचा एकप्रकारे प्रसारच होत आहे. सोशल डिस्टन्स ठेवत अंगणात कॅरम खेळतानाचा व्हिडीओ असेल किंवा अंगणात कॅरमची चौकट आखून चक्क माणसेच सोंगटी व स्ट्रायकरचे काम करतानाच एक गमतीदार व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे. या कालावधीत कॅरमच्या मागणीतही कमालीची वाढ झाली असून येणाऱ्या काळात अशा अडचणीच्या वेळी कॅरमच साथीला येतो हे लक्षात घेता भविष्यात सर्व घरांमध्ये मोठ्याप्रमाणात कॅरमचा शिरकाव होणार असल्याचे शुभसंकेत कॅरम रसिकांसाठी आहेत. यामुळे जगभर कॅरमचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आज जगभरात जवळपास २० देशात कॅरम अधिकृत स्पर्धंत्मक पातळीवर खेळला जात असून लॉकडाऊनमुळे अधिक देशात कॅरमचा फैलाव होण्यास मदत होण्याची चिन्हे आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कॅरम ओलीम्पिकमध्ये नेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आज जवळपास ५० दिवस झाले असून असे पुढे आणखी किती दिवस चालणार असा प्रश्न सर्वांपुढे आहे. काळाची गरज लक्षात घेत विविध खेळांच्या संघटना आपापल्या खेळ लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी व खेळाचा प्रचार कारण्याहेतू ऑनलाईन उपक्रम राबवत आहेत. यामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनही अग्रेसर आहे. आपणास हे माहीत आहे का या मालिकेद्वारे कॅरम या खेळातील विविध माहिती व रेकॉर्ड्स असोसिएशन कॅरम रसिकांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचवत आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवर असलेले जवळपास १५०० पेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय सामन्यांचे व्हिडीओ कॅरम रसिकांसाठी मेजवानी ठरत आहे. यातील सर्वोत्कृष्ट सामन्यांचे व्हिडीओ व कॅरम या खेळातील माहिती सोशल मीडियाद्वारे कॅरम रसिकांपर्यंत पाठविण्याची मालिका असोसिएशनद्वारे करण्यात येत आहे. शिवाय अखिल भारतीय कॅरम फेडरेशननेही ९ व १० मे २०२० रोजी काही आंतर राष्ट्रीय खेळाडूंचे सराव सामने फेसबुक लाईव्ह करून कॅरम रसिकांना खुश केले होते. ५० मिनिटांच्या या खेळात एकंदर ५ महिला व ५ पुरुष खेळाडूंनी ११ व्हाईट स्लॅमची नोंद केली. त्यात सर्वाधिक ३ स्लॅमची नोंद विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने केली. तर संदीप दिवे व विकास धारियाने प्रत्येकी २ व्हाईट स्लॅम केले. शिवाय माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीने १ तर महिला माजी विश्व् विजेत्या रश्मी कुमारी, ऐशा साजिद खोकावाला व देबजानी तामूलीने प्रत्येकी १ व्हाईट स्लॅमची नोंद केली. असे जरी असले तरी आजच्या क्षणी एकंदर क्रीडा क्षेत्रावर फार मोठा आघात झाला आहे. कॅरमही यास अपवाद होऊ शकत नाही. परंतु तरीही शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करत सर्व परिस्थिती रुळावर आल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करत पुनः नव्या जोमाने कॅरम भरारी घेईल असा आमचा प्रयत्न राहील. स्पर्धेच्या हॉलमध्ये केवळ खेळणारा खेळाडू व पंच यांना प्रवेश द्यावे व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनल व फेसबुकवरून कॅरम रसिकांसाठी सामने दाखविण्याचा विचार सध्या सुरु आहे. शिवाय यंदाची वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धाही महाराष्ट्रात करण्याबाबत विविध ठिकाणी चाचपणी सुरु आहे. मात्र हे सगळे आपल्या हाती आहे. कोरोना नामक या आगंतुक पाहुण्याला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वानी राज्य व केंद्र सरकारच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.

 344 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.