बदलापुरसाठी १०० खाटांचे कोवीड रूग्णालय

गरजेनुसार क्षमता वाढवणार : डॉ. कैलास पवार

बदलापूर : बदलापूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णानाची संख्या लक्षात घेता शहरातच कोरोना बाधित रूग्णांवर उपचार व्हावेत यासाठी शहरात १०० खाटांचे कोविड रूग्णालय उभारण्यात येते आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यासाठी वैद्यकीय मदत देणार असून शिवसेना शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या रूग्णालयाला लागणाऱ्या १०० खाटा आणि इतर सामुग्री देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शहरातल्या कोरोना रूग्णांवर शहरातच उपचार करता येणार आहेत. या आठवड्यात या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. गरज भासली तर आणखी खाटा वाढवण्याची तयारी असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमधील रूग्णालये आता रूग्णांनी भरू लागली आहेत. शहरातील रूग्णालयांची क्षमता आता संपत आली असून नवनव्या मोठ्या संकुलामध्ये आणि इमारतींमध्ये खाटांची तयारी केली जात आहे. सर्वच शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना बदलापुरसारख्या शहरांतून मुंबई मध्ये रूग्णांना नेणे येत्या काळात जिकीरीचे होऊ शकते. त्यामुळे शहरातील वाढत्या रूग्णांसाठी शहरातच सोय करणे आवश्यक आहे. बदलापूर शहरातच कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केली होती. या कोविड रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनवामन म्हात्रे यांनी दिले होते.

वामन म्हात्रे यांच्या या मागणीचा जिल्हा पातळीवर सकारात्मक विचार झाला असून येत्या काही दिवसात बदलापूर शहरात कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. शहरातील सोनिवली येथील बीएसयुपी प्रकल्पात १०० खाटांचे रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याच आठवड्यात त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे. बदलापूर शहरातल्या बहुतांश रूग्णांवर येथे उपचार करणे सोपे होणार आहे. त्यांना याच शहरात असल्याने मानसिक आधार मिळू शकेल आणि मोठ्या शहरांतील खाटांवरचाही ताण कमी होईल असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी व्यक्त केला आहे.

शहरातल्या रूग्णांना शहराबाहेर जाण्याची गरज पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आम्ही शहरातल्या बीएसयुपी किंवा आणखी कोणत्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करता येईल का, याबाबत चाचपणी सुरू केली होती. त्यानुसार बीएसयुपी येथे सर्व बाबी सोयीच्या आहेत. त्यानुसार येथे केंद्र सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाली असल्याचे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले आहे. यासाठी लागणाऱ्या १०० खाटा आणि इतर आवश्यक सामुग्री शिवसेनेतर्फे देण्यात येणार असल्याचेही वामन म्हात्रे यांनी सांगितले. याच आठवड्यात या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वासही वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. या रूग्णालयामुळे शहरातल्या रूग्णांना शहराबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. या रूग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक आणि इतर कर्मचारीही उपलब्ध झाले असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

.

 982 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.