एकनाथ शिंदे यांच्याकडून क्वारंटाइन सेंटरला गरजेच्या वस्तूंचा पुरवठा


टॉवेल्स, बेडशिट्स, चादरी, सॅनिटायझर, साबण आदी वस्तूंचा पुरवठा
  दररोज अंडी आणि दूध उपलब्ध करून देणार
    क्वारंटाइन सेंटरला काहीही कमी पडू न देण्याच्या सूचना

 
ठाणे : करोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने अनेक ठिकाणी क्वारंटाइन सेंटर्स उभारली आहेत. करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची लागण होऊ नये, यासाठी या ठिकाणी अनेक व्यक्तींच्या निवासाची सोय करण्यात आली असून त्यांना सरकारच्या वतीने आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत. ठाण्यात भाईंदरपाडा परिसरात अशा प्रकारे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले असून तेथे प्रशासनाच्या बरोबरीनेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्वखर्चातून अनेक जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून दिल्या.
भाईंदरपाडा येथील या क्वारंटाइन सेंटरमध्ये ४०० ते ५०० जण आजघडीला आहेत. शासनाच्या वतीने त्यांना सर्व आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, काही वस्तूंची तातडीने आवश्यकता असल्याचे शिंदे यांना समजताच त्यांनी या वस्तू वैयक्तिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी टॉवेल्स, बेडशिट्स, सोलापुरी चादरी, साबण, सॅनिटायझर, हँडवॉश, टुथपेस्ट, टुथब्रश, पीपीई किट्स, हँड ग्लोव्ज, चहा किटली, इलेक्ट्रिक थर्मास, ट्रॉलीज, बादल्या, मग आदी वस्तू उपलब्ध करून दिल्या. तसेच, दररोज ५०० अंडींचा पुरवठा करण्यात येणार आहे.
या दररोज लागणाऱ्या वस्तू असून शासनाकडूनही त्यांचा नियमित पुरवठा सुरू आहे. मात्र, अनेकदा तातडीने काही वस्तूंची गरज लागत असून येथे राहाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.