त्याऐवजी दुकानदारांना आठवड्यातून वार ठरवून द्यावेत

 
 
बाजारातील गर्दी टाळण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने आयुक्तांना सुचवला पर्याय
 
 पनवेल : महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्याऐेवजी काही दुकानांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस परवानगी देताना वार निश्‍चित करण्याचे नियोजन करावे. सरसकट दुकाने उघडली गेल्यास बाजारपेेठेत मोठी गर्दी उसळून कोरोना विषाणूला आमंत्रण ठरेल, असा दावा करून यापुढे सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी न देण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
 नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी काही प्रमाणात बाजारपेठा खुल्या करण्याची युक्ती राज्य शासनाने लढविली आहे. त्याशिवाय तोंडावर आलेल्या पावसाळ्यापूर्वी काही इलेक्ट्रिक वस्तूंची दुरूस्ती करणारी दुकाने, नव्या इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, पाठ्यपुस्तकांची दुकाने, त्याशिवाय कपड्यांच्या दुकानांना राज्य शासनाने सुरू करण्यास मुभा दिली असली तरी पनवेल महापालिका क्षेत्रासह संपूर्ण तालुकाच रेड झोनमध्ये आहे. आता कामोठे शहर तर अतितीव्र रेडझोनमध्ये आयुक्तांनी घोषित केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली असताना दुकाने उघडण्यास सरसकट परवानगी देणे अधिक धोकादायक ठरू शकेल, असा दावा कडू यांनी केला आहे.
 जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना होत असलेली झुंबड पाहता, उसळणारी गर्दी कोरोना वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. अशात आणखी काही दुकानांची बाजारपेठ खुली केल्यास धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत विचार व्हावा, अशी सुचना देशमुख यांना केली आहे.
 कोरोना रूग्णांची आणि संशयितांची दक्षता घेतली जात असली तरी अद्याप त्याकडे अधिक गांर्भीयाने पाहून त्यांची सेवा आपल्या कर्मचार्‍यांच्या हातून घडावी, याकडे थोडे जास्त लक्ष देताना इंडिया बुल्समधील व्यवस्था अधिक चोख करण्याची गरज कडू यांनी वर्तविली आहे.

 402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.