संकट नव्हे संधी !- विकास महाडिक

नमस्कार, मित्रांनो। पत्रकार असल्याने माझ्याकडे ४६ प्रकारचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आहेत. मी ते केवळ चाळतो. त्यातलं काही चांगलं वाटलं तर वाचतो, पण त्यात कधीही भाग घेत नाही. कारण मला त्या चावडीवरच्या गप्पा वाटतात. निरर्थक, निष्क्रिय आणि अनावश्यक. पण आज यादवराव यांच्या एका सकारात्मक पोस्टमुळे मला स्वस्थ बसता आलं नाही. यादवराव यांची मी पहिली पोस्टसुद्धा वाचली आहे. संकटात कशी संधी दडलेली आहे, हे सांगणारी ती पोस्ट आहे. यादवराव यांचा मी तसा टीकाकार. त्याला आमचे कॉमन मित्र किशोर धारिया साक्षीदार आहेत, पण ज्यावेळी मी यादवराव यांचे शत प्रतिशत कोकण प्रेम पाहिलं, तेव्हा मी त्यांच्या प्रेमात पडलो. पायाला भिंगरी लावून आणि कमरेचं कुबड होईपर्यंत हा माणूस गेली अनेक वर्षे कोकणात फिरतोय. तेथील समस्या, उपाय आणि उद्योग यांचा दिवस रात्र विचार करतोय. झपाटलेला वगैरे म्हणतात ना तसा हा माणूस. ‘कोकण माझा आणि मी कोकणचा’ असे ब्रीद घेऊन झगडतोय. त्यात अनेकदा पदरमोडही करतोय. डोक्यावर कर्ज करून घेतोय, पण एकच ध्यास कोकण विकास एवढच त्याला माहित आहे. ‘करोना’ मुळे कोकणात रोजगार, उद्योग संधी निर्माण होत आहेत, हे त्यांनी ओळखलंय. त्यासाठी घसा फोडून ते सांगताहेत. कोकणात गेली अनेक वर्षे नोकरीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा इथे तरुणांना पिटाळण्याची मानसिकता आहे. एकदा पोरगा कुठेतरी शहरात चिकटला म्हणजे गंगेत घोडं न्हालं अशी कोकणी माणसाची मानसिकता आहे. त्यातून पोलीस आणि सैन्यात अनेक तरुण भरती झाले. मग मेंढरासारखे एकामागून एक नोकरी करायला महानगरात धडकले आणि मग तशी एक मानसिकता तयार झाली. ‘अमक्या तमक्याचे पोरगं बघ. कसं सेटल झालंय. तू पण तसाच हो’ हा एकच सल्ला कोकणातील वडिलधारे तरुणांना देऊलागले. मग काय शहरात यायचं आणि चाकरी करायची. होळी, गणपती आणि मे महिन्यात मात्र हा चाकरमानी न चुकता गावी जातो. तेव्हा काय करतो ? केवळ गॉसिपिंग, दारूकाम, भाऊबंदकी आणि कुटाळक्या. याशिवाय अपवादात्मक एखादे सकारात्मक काम होताना दिसतंय. कोकणातील नेत्यांनी स्थानिकांच्या या मानसिकतेचा अभ्यास करून आपल्या तुंबड्या भरल्या आणि स्वत:चा विकास साधला. कोकणचा विकास किती झाला हा संशोधनाचा विषय आहे. आता हेच पहा ना. मुंबई- गोवा रस्त्याचे रुंदीकरण इतक्या वर्षात झाले नाही. बाकीचा विचार करणे तर दूरच. आपल्या पिढीला ‘करोना’सारख्या महामारीचा सामना करावा लागत आहे, हे आपलं भाग्य आहे. या काळात सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि कौटुंबिक भावबंध स्पष्ट होत आहेत. ‘करोना’चे परिणाम काय होणार आहेत ते काळ ठरवेल, पण कोकणासाठी ही एक संधी चालून आली आहे, हे मात्र नक्की. यादवराव यांनी ती दाखवून दिली. पणन विभागाच्या सहकार्याने त्यांनी कोकणातील हापूस आंबा बागायतदारांचे पीक महानगरात आणून विकले. त्यांनी स्वत: ठाण्यात बसून पाच हजार पेट्या आपल्या ग्लोबल कोकणसाठी विकल्या. दीड लाख पेट्या बांद्याापासून चांद्याापर्यंत विकल्या. ‘करोना’ संसर्गाला न घाबरता कोकणातील बागायतदारांनी हे करून दाखवलं. अमेरिकेतील एक निवडणूक ही केवळ ‘यू कॅन’ या एका शब्दावर जिंकली गेली होती. म्हणूनच ‘वुई कॅन’ या दोन शब्दांवर आपण कोकणच्या अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकतो, पण त्यासाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक मानसिकतेत बदल आणि दुसरी सकारात्मक विचारसरणी. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे एक सूत्र प्रचलित होतं, पण गेल्या अनेक वर्षात आपण कनिष्ठ असलेल्या नोकरीला उत्तम समजू लागलो होतो. कोकणचा माझा जास्त अभ्यास नाही, पण तेथील मानसिकतेचा आहे. शेती आणि व्यापार हेच उत्तम असू शकणार आहे. सांगण्यासारखं खूप आहे, पण वाचण्याचा अलीकडे कंटाळा केला जातो. तात्पर्य एकच एखाद्याा निस्वार्थी निष्कलंक,निष्काम कर्मयोगीच्या मागे राहून आपण गाव, तालुका, जिल्हा आणि प्रांताचा आमूलाग्र बदल करू शकतो। करोना काळात आपण इतकं चिंतन आणि कृती केली तरी ईश्वाराचे आभार मानायला हरकत नाही.
धन्यवाद !
आपला कोकणपुत्र
विकास महाडिक

 661 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.