हरिओम @ ६२

दिवसेंदिवस विस्तारीत असलेल्या शहरांमध्ये गावपण जपणारी काही माणसं असतात. अंबरनाथमधील अशा माणसांची यादी करायला घेतली तर त्यात पत्रकार गिरीश वसंत त्रिवेदी यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. १० मे रोजी वयाची ६२ पूर्ण करीत असलेल्या या अवलियाला वयाच्या मापाने मोजता येणार नाही. कारण अजूनही विशी, पंचविशीतल्या पत्रकारितेतल्या तरुण पिढीसोबत संवाद साधत हा माणूस स्वत:ला कायम अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे’ हा याचा स्वभाव. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या समाजवादी विचारसरणीच्या वसंतराव त्रिवेदी यांच्या या धाकट्या चिरंजीवाने वडिलबंधू योगेशजींच्या पावलावर पाऊल ठेवत ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा वारसा कसोशीने जपला. स्थानिक बातम्यांना प्राधान्य मिळावे म्हणून अर्धशतकापूर्वी सुरू झालेला ‘आहुति’चा प्रवास आता गिरीशच्या नेतृत्त्वाखाली अतिशय दिमाखात सुरू आहे. दररोज नवनवी यशाची शिखरे काबीज करीत आहे.
अगदी अलिकडचेच उदाहरण घेऊया. सध्या लॉकडाऊनमुळे प्रिंट मिडीयापुढे अस्तित्त्वाचे मोठे संकट उभे आहे. अजूनही अनेकांना घरपोच वर्तमानपत्रे मिळत नाहीत. वृत्तपत्रांची वितरण व्यवस्था कोलमडली आहे. मात्र अशाही अवस्थेत गेल्या सव्वा महिन्यात ‘आहुति’ नियमितपणे प्रकाशीत होऊन घरोघरी वितरीत होतोय. काही वर्तमानपत्र विक्रेते त्यांना याकामात मदत करतात. याशिवाय गिरीशजी स्वत: सकाळी सात वाजल्यापासून घरोघरी वर्तमानपत्र टाकतात. त्यातून त्यांना काय मिळते, याचा हिशेब करायचा नसतो. गिरीशजी यांनी तो कधीच केला नाही. आपल्या गावातील सकारात्मक बातम्या ठळकपणे छापण्याचे व्रत त्यांच्या वडिलांनी स्वीकारले होते. गिरीशजी वयाच्या साठीनंतरही त्या व्रताचे पालन करीत आहेत. ‘हरिओम’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे. गावातील बरेचजण त्यांना ‘हरिओम’ या नावानेच ओळखतात, हाक मारतात.
शिवमंदिर हा त्रिवेदी कुटुंबियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अंबरनाथमधील या प्राचीन ठेव्याचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून या कुटुंबाने आपली लेखणी झिजवली. गिरीशजींनीही ‘आहुति’च्या माध्यमातून शिवमंदिराचे
महात्म्य विषद करणारे दोन विशेषांक प्रसिद्ध केले. शिवमंदिराविषयी कोणताही कार्यक्रम असेल, तर आपली सारी कामे बाजूला ठेवून गिरीशजी तिथे हजर असतात. सध्या संचारबंदी आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी आहे. मात्र या कठीण काळातही सकाळ-संध्याकाळ गिरीशजींची भ्रमंती सुरू आहे. त्यात सकारात्मक बातमीदारीबरोबरच जमेल तेवढी समाजसेवाही ते करीत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून आदर्श पत्रकाराचे कर्तव्य पार पाडत आहेत.
मुंबई,ठाणे ते अंबरनाथ परिसरातील पत्रकारांच्या तीन पिढ्यांशी थेट संवाद साधणारे गिरीशजी आपल्या पेशाशी इमान राखून आहेत. गेल्या दशकभरात प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ‘आहुति’चे उत्तम ब्रॅडिंग केले आहे. त्याला नावारूपाला आणले आहे. ‘आहुति’ अनेकदा गुरूवारी प्रसिद्ध होतो. त्याचदिवशी त्याची रंगीत आवृत्ती पीडीएफ स्वरूपात ते किमान हजार ते दीड हजार व्यक्तींना पाठवीत असतात. लॉकडाऊनला सुरूवात झाली आणि अंबरनाथ शहराला घडविणारे माजी नगराध्यक्ष आदरणीय दादासाहेब नलावडे यांचे पुण्यात मुलाच्या घरात निधन झाले. तेव्हा वर्तमानपत्रांच्या केवळ ई-आवृत्त्या प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे ती बातमी अनेक अंबरनाथकरांना समजलीच नव्हती. पुढील आठवड्यात ‘आहुति’ चा अंक प्रसिद्ध झाला, तेव्हा अंबरनाथकरांना ‘दादा नलावडे’ निवर्तल्याची बातमी समजली.
गेली दहा वर्षे एक विशिष्ट विषय घेऊन गिरीशजी ‘आहुति’चा दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची अतिथी संपादक म्हणून नियुक्ती करतात. अंबरनाथहून प्रसिद्ध होणाºया ‘आहुति’च्या दिवाळी अंकाची कीर्ती आता राज्यभरात पोहोचली आहे. दिवाळी अंकाला काही राज्य पुरस्कारही मिळाले आहेत. अनेकांनी आपल्या संग्रहात ‘आहुति’चे दिवाळी अंक जपून ठेवले आहेत.

मंत्रालयापासून पंचायत समितीतील एखाद्याा कारकुनापर्यंत अफाट जनसंपर्क असलेली ही व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाºया व्यक्ती सगळ्यांना ‘गिरीशजी’ आपलेसे वाटतात. उतारवयातही तरुणाला लाजवेल, इतका उत्साह असणाºया गिरीशजींना उत्तम आरोग्य, सुख शांंती आणि समाधानी दिर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या जन्मदिनी प्रार्थना.

अनिल डावरे

 759 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.