आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून तो ४४०च्या पार गेला आहे. केंद्र सरकारचे पथक अलीकडेच महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते त्यावेळेस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल , असा धोका या पथकाने व्यक्त केला होता. नजीकच्या काळातील हा धोका वेळीच ओळखून नवी मुंबई महापालिकेने अशा संभाव्य परिस्थितीला खंबीरपणे हाताळण्यासाठी नवी मुंबईमध्ये १००० खाटांचे कोरोना उपचार रुग्णालय तातडीने उभारावे , अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. या मागणीचे लेखी पत्र त्यांनी ४ मे रोजी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे.
नवी मुंबई मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे महापालिकेने उपचारासाठी पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून सोय केलेली आहे काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केलेले आहेत. परंतु कोरोनाचा संभाव्य मोठा धोका पाहता या सुविधा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे. तोकड्या वैद्यकीय सेवा – सुविधांमुळे गोंधळा सारखी परिस्थिती उद्भवू नये याची वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लवकरात लवकर १००० खाटांचे रुग्णालय सुरू करावे लागणार आहे असे आमदार नाईक यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन बेड ,बिना ऑक्सिजन बेड ,अति दक्षता कक्ष, पॅथॉलॉजी लॅब, फीवर क्लीनिक या सुविधांसह हे रुग्णालय सुसज्ज असावे अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. आमदार नाईक यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने अशाप्रकारचे १००० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्र हे या रुग्णालयासाठी सुयोग्य ठिकाण असून त्याची चाचपणी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ करीत असल्याचे समजते.
517 total views, 3 views today