संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात दारूची दुकाने बंद ठेवा

अखिल भारतीय जनवादी महिला संघटने राज्यसरकारकडे मागणी केली आहे

ठाणे : महाराष्ट्र हे देशातील कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य आहे. ही कोरोनाची आपत्ती आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गरीब वंचित कुटुंबांच्या जीवनमानावर व प्रामुख्याने महिलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. या परिस्थितीतून त्यांना दिलासा देण्यासाठी केशरी कार्डधारकांना धान्य देणे तसेच महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारातून त्यांना आधार देण्यासाठी सुरू केलेली हेल्पलाईन या काही गोष्टींचे स्वागत करत असतानाच, ४ मे पासून कंटेनमेंट एरिया वगळता राज्यभरातील दारूची दुकाने सुरू करण्याचा जो घातकी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्याचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटना तीव्र विरोध करीत आहे आणि हा निर्णय ताबडतोब मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नसीमा शेख आणि राज्य सचिव प्राची हातीवलेकर यांनी केली आहे.

दारू विक्री सुरू झाल्यामुळे सर्व दारूच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी होऊन लॉकडाऊनच्या काळात शारीरिक अंतर ठेवण्याच्या निर्णयाला हरताळ फासला जात आहे. गरीब कुटुंबातील महिला घरातील तुटपुंजी रक्कम वापरून कसेबसे घर चालवत असताना व्यसनी पुरुष हे पैसे दारूसाठी संपवून टाकतील एवढेच नव्हे तर घरातील धान्य तसेच भांडीकुंडी व इतर वस्तूही दारूसाठी विकून टाकतील. लोकडाऊन काळात काम आणि वेतन मिळत नसल्यामुळे अशा बाबी घडण्याची शक्यता जास्त आहे. लॉकडाऊनच्या या अवघड काळात दारू सेवनामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची रास्त भीती आहे. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीत वाढ होऊ शकते व त्यामुळे सद्य परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक अवघड होईल.

कोरोनाच्या आपत्तीमुळे गंभीर संकट उभे असताना पीएम केअर्स फंडातून अथवा अन्य मार्गाने केंद्राकडून महाराष्ट्राला कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर जीएसटीच्या परताव्याची पूर्ण थकबाकीही मिळालेली नाही. यामुळेच कदाचित राज्याला महसूल मिळविण्यासाठी दारू विक्री सुरू ठेवण्याची पाळी आली असेल, तरीही या दारूविक्रीमुळे होणाऱ्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष करणे ही घोडचूक ठरेल. केंद्र सरकारने राज्याला जीएसटी ची थकित रक्कम तसेच आर्थिक मदत तातडीने करावी अशी मागणी देखील अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात दारू सेवनाने होणारे भयानक दुष्परिणाम लक्षात घेता संपूर्ण राज्यात दारू विक्री बंद करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे.

 507 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.