दिग्दर्शनासाठी १९८४ ते २००३ या कालावधीत मिळवली होती ३० पारितोषिके.
ठाणे : सुप्रसिद्ध रंगकमी, नाट्य प्रशिक्षक विनायक दिवेकर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री उशिरा येथील राहत्या घरी निधन झाले ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
स्वराज्य रक्षक संभाजी, अस्मिता, तूच माझा सांगाती, एक महल हो सपनों का, पाऊस येता येता आदी अनेक मालिकांमध्ये त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन केले. न्यूड, सायकल, आँखे आदी चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. एक प्रयोगशील रंगकर्मी म्हणून सिने, नाट्य वर्तुळात त्यांची ओळख होती.
नाखवा हायस्कुलमध्ये शालेय तर जोशी-बेडेकरमध्ये महाविद्याालयीन शिक्षण घेतलेल्या विनायक यांच्या नाट्य क्षेत्रातील उमेदवारीची सुरूवात ठाण्यातूनच झाली. त्यानंतर पुढील ११ वर्षे मुंबई विद्याापीठात त्यांनी नाट्य प्रशिक्षण दिले. मुंबई विद्याापीठाच्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन ड्रॅमेट्रिक्स’चे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते.
ऐशीच्या दशकात एका नव्या दमाचा प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून विनायक यांनी रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली. मित्र सहयोग, कलासरगम या नाट्य संस्थांमधून अभिनय आणि दिग्र्दशनाचे ध़डे गिरवलेल्या विनायक यांनी महाविद्याालयीन काळापासूनच ‘चेस’, ‘काळ, काम वेग’ ‘द ब्लाइंड पीपल’ ‘गोष्ट’, ‘पंचकम’ अशा एकापेक्षा एक सरस एकांकिकांचे दिग्दर्शन करून नाट्य वर्तुळातील जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘लढाई’, ‘खजिन्याची विहीर’, ‘चित्रलेखा’, ‘राधी’, ‘घरातलं पडकं घर’ या नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विनायकने दिग्दर्शनासाठी १९८४ ते २००३ या कालावधीत ३० पारितोषिके मि़ळवली. त्यांची ‘घर जपायला हवं’, ‘मुलगी मजेत आहे’ ही नाटके खूप लोकप्रिय झाली. २००७ मध्ये त्यांनी एसएनडीटीसाठी दिग्दर्शित केलेल्या ‘पंचकम’ या एकांकिकेला राष्ट्रीय युवा महोत्सवात अखिल भारतीय स्तरावर पहिले पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय युवा महोत्सवातच आनंद म्हसवेकर लिखीत विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पाणी रे पाणी’ या एकांकिकेला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला. १९९९ मध्ये आकाशवाणीवर त्यांनी सादर केलेल्या ‘राजा कालस्य कारणम्’ या अभिनव कार्यक्रमास रडिओच्या वार्षिक संमेलनात प्रथम पारितोषिक मिळाले होते.
673 total views, 1 views today