एपीएमसी मार्केटमध्ये कोव्हीड १९ विशेष तपासणी शिबिर संपन्न

४ हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेची २३ नागरी आरोग्य केंद्रे व ४ रूग्णालय याठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहेत. या शिवाय आशियातील सर्वात मोठी असणारी कृषी बाजारपेठ असणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील पाचही बाजारात कोव्हीड-१९ तपासणी केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.

तथापि मागील काही दिवसांमध्ये एपीएमसी मार्केट परिसरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याठिकाणी कोरोना विषयक तपासणीचे विशेष शिबिर लावण्याचे नियोजन होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार आज एपीएमसी मार्केटमध्ये महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना विषयक विशेष तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४ हजाराहून अधिक व्यापारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, कामगार, मजूर यांची कोव्हीड-१९च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.

या तपासणीकरिता एक डॉक्टर व त्यांच्यासमवेत पॅरामेडीकल स्टाफ असे ३० वैद्यकिय समूह तयार करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेद्यकीय समुहासह डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालय आणि तेरणा रूग्णालय या रूग्णालयांचे वैद्यकीय समुह देखील सहभागी होते. या डॉक्टर्समार्फत उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांचे थर्मल स्कॅनींग करण्यात आले. तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा या काळात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्क आला होता काय ? त्यांना सर्दी, ताप, खोकला. श्वास घेण्यास त्रास यापैकी काही लक्षणे जाणवतात काय? अशा प्रकारची माहिती विचारण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले. या स्वॅब कलेक्शनकरिता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह २ मोबाईल रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या विशेष तपासणी शिबिराचा लाभ एपीएमसी मार्केट मधील ४ हजाराहून अधिक व्यक्तींनी घेतला.

 516 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.