अनोख्या पध्दतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
बदलापूर : कोरोनाच्या या संचारबंदीच्या काळात बदलापूर मधील कामगार भाग्यवान ठरले आहेत. अनेक ठिकाणी कामगार भुकेने आणि आपल्या गावाला जाण्यासाठी व्याकुळ झालेले असतांना बदलापूरमधील कामगारांना चक्क गरमागरम पुरणपोळीचे जेवण मिळाले. बदलापूर मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन शिवसेनेच्या वतीने बदलापूर मधील ३ हजार कामगारांसाठी गोड जेवणाची सोय करण्यात आली होती. पुरणपोळीचे जेवण असल्याने कामगारांनी देखील या जेवणासाठी लांबच लांब रांग लावली होती. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दोन्ही वेळेस पुरणपोळीचे जेवण दिल्याने कामगारांनी देखील त्याचा मनमुराद आस्वाद लुटला. शिवसेनेच्या महिला आघाडीचे यात फार मोठे योगदान आहे.
बदलापूर शहरात अडकुन पडलेले आणि हाताला काम नसणाऱ्या ३ हजार कामगारांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गोड जेवण देण्याचा यशस्वी प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत. यंदाचा महाराष्ट्र दिन हा हीरक महोत्सवी आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम करण्याचा मनोदय आणि नियोजन होते. मात्र कोरोनाच्या संचार बंदी मुळे काहीही करणे शक्य नव्हते. हे लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी कामगारांना गोड जेवण देण्याचा मनोदय व्यक्त केला. रोज तीन हजार कामगारांना गरमागरम जेवण शिसवनेच्या वतीने देण्यात येत आहे.
शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची कामगारांना गोड जेवण देण्याची कल्पना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उचलून धरली. बाहेरून गोड पदार्थ मिळणे तेही मोठ्या प्रमाणात मिळणे अशक्य असल्याने महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. शिवसेनेच्या महिला पदाधिका-यांनी प्रत्येकीला जमेल तेवढय़ा पुरणपोळी आपापल्या घरून तयार करुन त्या एकत्रित केल्या. बदलापूरातील उत्साही महिला शिवसैनिकांनी तब्बल ५ हजार पुरणपोळी तयार करुन आणल्या.
महाराष्ट्रदिन व कामगार दिनी म्हणजेच एक मे रोजी दुपारी ३ हजार आणि रात्री २ हजार अशा पाच हजार कामगारांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली. कोरोनाची संचार बंदी जाहीर झाली तेंव्हा पासून बदलापूर शहरात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे सातत्याने कामगारांना आणि गरजू व्यक्तींना जेवणाची तसेच हजारो कुटुंबांना धान्याचे वाटप करित आहे. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या जेवणात पुरणपोळीसोबत जीलेबी आणि गोड शिरा देखील ठेवण्यात आला होता. या जेवणाचा बेत पाहुन कामगारांनी देखील त्या जेवणासाठी लांबच लांब रांग लावली होती. अर्थात सुरक्षित अंतर राखत सर्वानी पुरणपोळीचे जेवणाचा स्वाद घेत आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले.
449 total views, 1 views today