संकटाचे संधीत रूपांतर
बदलापूर : “रडून नव्हे तर लढून जिंकायचे” हे तत्व अंबरनाथ तालुक्यातील बळीराजाने स्वीकारलेले पहावयास मिळत आहे. कोरोना संकटामुळे एकीकडे सारे जग ठप्प झालेले असताना बळीराजा शेतकरी मात्र या पेचातून बाहेर पडण्याचे नवनवे उपाय योजत आहे. आपण सारे घरी बसलेलो असताना शेतकरी मात्र त्यांच्या शेतात खरीप पूर्व कामे करण्यात मग्न आहे. त्याचबरोबर शेतात पिकणारा नाशवंत भाजीपाला, फळे उन्हात वाळवून पुढील काळासाठी राखूनही ठेवत आहे. त्यांच्या या क्लृप्तीमुळे भविष्यात या भागात फळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरेच बळीराजा हा सर्व संकटाना कायम तोंड देतानाच आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करताना पाहून मनाला उभारी मिळते.
वितरण व्यवस्था नसल्याने सध्या भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भात शेती, कढधान्या बरोबरच त्यांच्या शेतात, वावरात भाजीपाला आणि फळ लागवडही करतात. गावांलगतच्या शहरांमध्ये या मालाची चांगल्या भावाने विक्री होत असल्याने त्यातून शेतकऱयांना अधिक उत्पन्न मिळते. बहुतेक बागायतदारांनी त्यांच्या शेतात आणि शेतघर परिसरात काम करण्यासाठी कायम स्वरूपी मजुर कुटुंबे ठेवली आहेत. त्यांचे वेतन देण्यासाठी या पैशाचा त्यांना उपयोग होत असतो. अंबरनाथ तालुक्यातील बहुतेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीने लागवड करीत असल्याने त्यांच्याकडची फळे आणि भाजीपाल्यास खूप मागणी असते.
कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आता अनेक शेतकऱयांनी आपापल्या आवारात चिकु, पेरू, केळी, आंबा, फणस, काजू, आवळा आदी फळबागांची लागवड केली आहे. त्याचबरोबरीने कोबी, फ्लॉवर, मेथी, दुधी भोपळा, कारली, वांगी आदी भाज्यांची लागवड करतात. त्यातच अनेक शेतकऱ्यानी कृषी पर्यटनाचा जोड व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्यांना दुहेरी लाभ मिळतो. एक म्हणजे पर्यटक आल्याने त्यांच्या निवास, भोजन व नाश्त्याची सोय करून उत्पन्न मिळते. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांमुळे त्यांच्या शेतात पिकणारा भाजीपाला व फळे हि जागेवरच विक्री होत असल्याने या शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्रीचा प्रश्न येत नव्हता.
कोरोनाच्या या संचारबंदीमध्ये भाजीपाला आणि फळ विक्रीला परवानगी असली तरी अनेक गावांनी आपापल्या सीमा बंद केल्याने शेतातून शहरात माल येण्यात अडचणी येत आहेत. त्याच प्रमाणे पर्यटक येत नसल्याने जागेवर विक्रीही थांबली आहे. आणि बाहेरील व्यापारी गावबंदी असल्याने शेतात माल घ्यायला येत नाहीत. त्यामुळे ऐन सुगीच्या हंगामात शेतकऱयांची पंचाईत झाली आहे. परिणामी शेतातील फळे व भाजीपाला पडून वाया जाण्याची शक्यता वाढू लागली आहे. हे उत्पादन वाया जाऊ नये म्हणून त्यावर उपाय म्हणून भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया करून ते अधिक काळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले आहेत.
चिकुची चिप्स, पावडर, केळ्यांचे चीप्स
अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळील डोणे गावातील शेतकरी चंद्रकांत मोरे यांच्या शेतात सध्या चिकु आणि सोनकेळीचे चांगले पीक आले आहे. एरवी याकाळात त्यांच्याकडे पर्यटकांचा ओघ असतो. येणारा पर्यटक हे शेतात पिकणारा भाजीपाला आणि फळे विकत घेऊन जातात. मात्र आता कोरोनाच्या या संचार बंदीमुळे ते शक्य नसल्याने फळे व भाजी पाला पडून रहाण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोरे यांनी चिकूचे चिप्स तयार केले आहेत. त्याचप्रमाणे चिकु वाळवून त्याची पावडर केली आहे. चिकूची पावडर करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी झाला आहे. मिल्क शेक अथवा नैसर्गिक आईसक्रीम करण्यासाठी ही चिकु पावडर उपयुक्त ठरू शकते. वांगणी आणि आसपासच्या परीसरात या पावडरला मागणी वाढू लागली असल्याने चंद्रकांत मोरे यांनी अन्य शेतकऱ्यांनाही हि प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे पिकलेल्या केळ्यांचे वाळवून चिप्स केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या शेतातील कारली, फ्लॉवर, शेवगा या भाज्याची वाळवून पावसाळ्याची बेगमी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व वाळवण्यासाठी चंद्रकांत मोरे यांनी सोलर ड्रायरचा वापर करून शास्त्रशुद्धरित्या वाळवण प्रक्रिया केली आहे. त्यामुळे या वाळवणात माती किंवा अन्य घटक मिसळत नाहीत. शास्त्रशुद्ध वाळल्याने आता हे पदार्थ अधिक काळ टिकतील, असा त्यांचा विश्वास आहे.
बेंडशीळ येथील कृशीभूषण शेतकरी राजू भट यांनी त्यांच्या शेतातील पेरू पासून जॅम तयार केला आहे. फणस वाफवून नंतर त्याची पोळी तयार करता येते. त्याच प्रमाणे आंब्यावरही विविध प्रक्रिया करून उत्पादन घेता येते. यंदा त्यांनी रब्बी हंगामात वांगी, कारली, गवार या भाज्यांची लागवड केली. लॉकडाऊनमुळे त्यांना भाजी बाहेर विकता आली नाही. त्यामुळे त्या भाज्या वाफवून वाळविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या या संचार बंदीमुळे कृषिक्षेत्राला वेगळी दिशा मिळेल आणि हा व्यवसाय चांगल्या दर्जाचा होऊ शकेल. नवनवीन युवक या क्षेत्राकडे निश्चित वळतील असा ठाम विश्वास राजू भट यांनी व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे संचार बंदी मुळे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढेल असेही भट यांनी सांगितले.
643 total views, 1 views today