दहा रूपयात जेवण उपक्रमाची वर्षपूर्ती

वर्षभरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

अंबरनाथ : कामगार नगरी अंबरनाथमध्ये कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजातील गोरगरीबांना अतिशय अल्प पैशात एकवेळचे का होईना पोटभर आणि सकस जेवण मिळावे या हेतूने येथील मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केलेल्या दहा रूपयात जेवण या उपक्रमाला आज १ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मानवसेवा हीच ईश्वारसेवा मानून अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेला शहरातील अनेक व्यापारी, व्यावसायिक, सर्वपक्षीय नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे गेले वर्षभर दररोज ही सेवा सुरू राहिली. दरम्यानच्या काळात जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी तसेच सध्या करोना संकट काळात या योजनेचे महत्त्व अधोरेखीत झाले. गेल्या वर्षभरात या योजनेचा लाभ १ लाख दोन हजार २०० नागरिकांनी घेतला. शिवसेनेने या योजनेची दखल घेतली. राज्यात गोरगरीबांसाठी वरदान ठरलेल्या राज्य शासनाच्या शिवथाळी योजनेचे हे मूळ आहे.
दहा वर्षांपूर्वी २०१० मध्ये मानवसेवा ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली. रमेश पटेल, अरविंद वाळेकर, श्री विश्वनाथ पनवेलकर, हसमुख हरिया, संजय दलाल, जयंतीभाई नागडा, गुणवंत खरोदिया,नवीन शाह,
रुपसिंग धलं, श्रीनिवास वाल्मिकी, दत्ता घावट, विक्रमसिंग राठोड, दीपक पवार, दिलीप गावडे आदी अनेकजण हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात. नंदकुमार शर्मा गेल्या दहा वर्षांपासून हिशेब तपासण्याचे काम चोखपणे करीत आले आहेत. राजेंद्र वाळेकर, बेलाराम कुंभार डोळ्यात तेल घालून विश्वस्त मंडळाच्या कामावर देखरेख करतात. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेतून हे काम करीत असल्याची माहिती अरविंद वाळेकर यांनी दिली आहे.

आपत्तीकाळात आधार
यंदा जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले होते. तेव्हा पूर परिस्थितीमुळे हताश झालेल्या अंबरनाथ पश्चिम परिसरातील ११ हजार नागरिकांना ट्रस्टच्या वतीने विनामूल्य जेवण देण्यात आले. आता करोना संकटकाळात आतापर्यंत ३७ हजार नागरिकांना विनामूल्य जेवण आणि १२ हजार ७५० नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्याना नाश्ता देण्यात आला. याशिवाय गोर गरीब नागरिक आणि परप्रांतीय मजुरांना लाखों रुपयांचे अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर सॅनिटायझर आणि मास्कही विनामूल्य देण्यात आले.

नागरिकांचे सहकार्य हेच भांडवल
दहा रूपयांमध्ये पोटभर जेवण कुणालाही देता येणार नाही. मात्र संस्थेचे आजी-माजी सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या देणग्यांवर ही अन्नसेवा देता येणे शक्य झाल्याची माहिती संयोजकांनी दिली. अंबरनाथ पश्चिम विभागातील गावदेवी मंदिर परिसरात दुपारी १२ ते २ यावेळेत दहा रूपयांमध्ये जेवण दिले जाते. या योजनेत अंबरनाथ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना यथाशक्ती देणगी देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संपर्क : ९३२४६८४४४१.

 695 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.