लॉकडाऊनच्या काळात गोदामातील ऐवज लुटणारे गजाआड

जी कॉम लॉजिस्टीक प्रा. लि या एल.जी कंपनीच्या गोडावूनचे पाठीमागील शटर उचकटून चोरट्यांनी ४० लाख ५० हजार ९३५ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता

ठाणे : कोरोना च्या पाश्र्वाभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याची संधी साधून भिवंडीतील गोडावून फोडून ४० लाख ५० हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ६९ हजार ४३९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांना न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपा भागातील जी कॉम लॉजिस्टीक प्रा. लि या एल.जी कंपनीच्या गोडावूनचे पाठीमागील शटर उचकटून चोरट्यांनी ४० लाख ५० हजार ९३५ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यात तीन एलसीडी टिव्ही आणि मोबाईलचा समावेश होता. या गुन्ह्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड तसेच अप्पर पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्यंकट आंधळे आणि भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राम भालसिंग यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांनी तपास पथके तयार केली होती. तसेच गोडावून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले होते. त्याचदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक यांना खबऱ्याकडून महत्वाची माहिती मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे यांनी भिवंडी तालुक्यातील रहिवाशी यश विजय डोंगरे आणि योगेश केशव पाटील या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. गोडावूनमधून चोरलेला मुद्देमाल योगेश याच्या घरातून पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.

 429 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.