पोलिस बनले देवदूत

सर्पदंश झालेल्या मुलाचे प्राण वाचवले


बदलापूर : कोरोनाच्या संचारबंदीमध्ये बदलापूरचे पोलीस हे देवदूत म्हणून धावून येत असल्याचा अनुभव बदलापूरकरांना येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतांना बदलापुरातील एक व्यक्ती आपल्या सर्पदंश झालेल्या मुलाला खांद्यावर घेऊन जात होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी तातडीने समयसूचकता दाखवत त्या मुलाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकता व संवेदनशीलतेमुळे एका बालकाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी वेळेवर मदतीला धावून येत रुग्णालयात दखल केल्याने आपल्या मुलाचे प्राण वाचले हे कळल्यावर त्या मुलाच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. हे चित्र पाहून पोलिसही भारावून गेले.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक संतोष राणे आणि पोलिस कॉन्स्टेबल दिलीप साहिल हे शिरगाव भागात गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन अतिशय घाई घाईत चालला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन चौकशी केली असता, रिक्षा बंद असल्याने आपल्या सर्पदंश झालेल्या मुलाला खांद्यावर घेऊन ग्रामीण रुग्णालयात जात असल्याचे पोलिसांना समजले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. त्यामुळे पोलिसांनी समयसूचकता दाखवत तात्काळ या व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला दुचाकीवर बसवून ग्रामीण रुग्णालय गाठले.
दरम्यानच्या या काळात पोलिस नाईक राणे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांशी मुलाच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. वेळेवर रुग्णालयात आल्यामुळे उपचारांना यश आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी मुलाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पहायला मिळाले.
चंद्रकांत जाधव नावाची हि व्यक्ती मोलमजुरीचे काम करणारी आहे असे कळल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी या मुलाच्या वडिलांना आर्थिक मदतही दिली. गेल्या दहा दिवसांपूर्वी खरवई भागात राहणारी एक गरीब महिला दोन वर्षांच्या मुलाला घेऊन भर उन्हात रस्त्याने पायी रुग्णालयात घेऊन जाताना दिसली होती. त्यावेळीही पोलिसांनी त्या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात पोहचवले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख यांनी त्यावेळी त्या महिलेला आर्थिक मदत दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी खाजगी रुग्णालयातील वैधकीय अधिकाऱ्यांना त्या महिलेची परिस्थिती सांगितल्यावर त्या अधिकाऱ्यांनीही त्या महिलेकडून पैसे न घेता प्राथमिक उपचार केले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूर पूर्व पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले असून याबद्दल बदलापूर पूर्व पोलिसांचे कौतुक होत आहे.

 406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.