आवश्यक मान्सून पूर्व बांधकामांना सशर्त परवानगी

नविन बांधकामांना परवानगी नाही, अटींची पूर्तता न झाल्यास कारवाईचा इशारा

ठाणे : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पाऊस मोठया प्रमाणात झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. शहराच्या विविध भागात अर्धवट स्थितीतील कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशी बांधकामे, जोत्यासाठी व बेसमेंटसाठी केलेली खोदकामे, अश्या ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही व त्यामुळे जीवितास धोकादायक स्थिती उद्भवू शकते. हे लक्षात घेवून ठाणे जिल्हयातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषद यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बांधकामांना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

या आदेशामध्ये कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये हे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अर्धवट स्थितीतील जोत्यांचे बांधकाम, बेसमेंटचे बांधकाम, संरक्षक भिंत बांधकाम, Shore Pilling Work इत्यादी भूस्खलन प्रतिबंधक बांधकामे, आजूबाजूच्या इमारती, रस्ते यांना पाणी साचून धोकादायक ठरु शकतील अथवा डासांची निर्मिती वाढेल अशी अर्धवट स्थितीतील बेसमेंटच्या भरावांची (Back Filling) कामे यानाचा फक्त परवानगी देण्यात आलेली आहे.

        लॉकडाऊन आदेश अंमलात आल्यामुळे अर्धवट स्थितीत असलेली व तशीच राहिल्यास  धोकादायक ठरु शकतील अशी इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्तीची (Structural Repairs)   बांधकामे. लॉकडाऊन आदेश अंमलात येण्यापूर्वी प्रत्यक्षात सुरु झालेली, आजमितीला अत्यावश्यक असलेली  जलरोधक काम, राहत्या इमारतींमधील आजमितीला अत्यावश्यक असलेली, आधीपासून सुरु झालेली परंतुअपूर्ण अवस्थेतील प्लास्टर, प्लबिंग इत्यादी स्वरुपाची  दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी आहे. 

वरील कामांसाठी आवश्यक असलेली माल वाहतूक ही १७ एप्रिल रोजीच्या मार्गदर्शक सुचनांमधील परिच्छेद १२ मधील तरतुदींना अधीन राहून करता येईल. त्यासाठी वाहतूक परवाना व्यवस्था तसेच बांधकामासाठी आवश्यक कर्मचारी, यंत्रचालक, मजूर यांना एक वेळ कामाचे ठिकाणी आणणेसाठी वाहतूक परवाना देणेची व्यवस्था महानगरपालिका आयुक्त यांनी परवाना देणेसाठी प्राधिकृत केलेले स्वाक्षरीकर्ता,नगरपरिषदेसाठी मुख्याधिकारी यांनी करावी. सदरचे कामगार हे महानगरपालिका,नगरपरिषद यांनी त्यांचे क्षेत्रात जाहीर केलेल्या Containment Zone मधून कामासाठी येणार नाहीत, याची दक्षता स्वाक्षरीकर्ता यांनी घ्यावी.

बांधकामावरील पर्यवेक्षण करणारे कर्मचारी, विविध यंत्रचालक व मजूर यांना येणेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येणार नाही. या सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था बांधकामाचे ठिकाणीच (In Situ) करण्यात यावी. सदर कामकाजाचे ठिकाणी १७ एप्रिल रोजीचे शासन आदेशातील परिशिष्ट १ व २ मध्ये दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

बांधकामाच्या जागेस बॅरिकेडींग करुन घेण्यात यावे. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी “सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व तातडीचे मान्सून पूर्व बांधकाम” असा ठळक स्वरुपातील फलक दर्शनीय ठिकाणी लावणेत यावा. सदर सवलत, परवानगी ही स्थानिक स्वराज्य संस्थेने जाहीर केलेल्या कन्टेनमेंट झोनमध्ये लागू असणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून एखादे नवीन क्षेत्र कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित झाल्यास, अशा क्षेत्रामध्ये तोपर्यंत देण्यात आलेल्या सदर सवलती रद्द होतील.

शासनाकडून आखलेल्या अटी शर्तीचे पालन होत असल्याची खात्री परवानाधारक, परवाना देणारे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता यांनी करून घ्यावी त्या शिवाय परवानगी देवू नये असे जिल्हाधिकात्यांनी स्पष्ट केले आहे.
१) कामगारांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था काम चालू असलेल्या परिसरातच (In Situ) करावी लागेल.
२) बांधकाम ठिकाणी दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक कामगारांचे थर्मल स्कॅनिग करणे बंधनकारक करावे. आठवडयातून दोन वेळा सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. तसेच ज्यांची शारीरिक क्षमता चांगली असेल त्यांनाच काम करण्याची मुभा देण्यात यावी. आजारी कामगारांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था तयार ठेवावी.
३) बांधकामाचे जागेवर गर्दी टाळावी तसेच Social Distancing Protocal चे काटेकोर पालन करावे. दोन व्यक्तींमधील कमीत कमी अंतर १ मीटर ठेवावे. सर्वांना हस्तांदोलन टाळण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
४) कामगारांनी चेहऱ्यावर स्वच्छ धुतलेला कपडा अथवा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच गरजेनुसार हातमोजे व ॲप्रन परिधान करावा. हातमोजे खिशात घालण्याचे टाळावे.
५) हाताने चेहरा, डोळे, नाक, तोंड यांस स्पर्श करु नये.
६) बांधकामावर कार्यरत असणाऱ्या मजूरांनी व इतर कर्मचारी यांनी एकमेकांचे मोबाईल फोन, रुमाल, पाणी बॉटल, ग्लास इत्यादी बाबी वापरू नयेत अथवा हाताळू नयेत.
७) भ्रमणध्वनीचा वापर करताना शक्यतो स्पिकर फोनचा वापर करावा. भ्रमणध्वनीचा स्पर्श शक्यतो चेहऱ्याला टाळावा.
८) कामाच्या ठिकाणी ज्या वस्तूंना वारंवार हाताने स्पर्श होण्याचा संभव आहे, अशा बाबी उदा.प्रवेशद्वार, सर्व दरवाजाचे हँडल, पाण्याचे नळ, स्वच्छतागृह, अवजारे तसेच तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेले निवारागृह ठराविक कालावधीनंतर १% प्रमाणात सोडियम हॉयपोक्लोराईट असलेल्या निर्जतुंकीकरण द्रावणाने स्वच्छ करावेत.
९) कामगार, कर्मचारी यांना जेवणापूर्वी अथवा काम संपलेनंतर तसेच आवश्यक तेव्हा हात धुणेसाठी साबण, हँडवॉश, पाणी व कामादरम्यान निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. दैनंदिन काम संपलेनंतर लगेच साबण व स्वच्छ पाण्याने अंघोळ करण्याच्या सूचना सर्वांना द्याव्यात.
१०) बाहेरील व्यक्तींचा प्रवेश टाळण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था करावी लागेल.
११) या परिपत्रकान्वये देण्यात आलेली बांधकाम दुरुस्ती परवानगी प्रत व कामगारांच्या प्रवासाच्या परवानगीची प्रत स्थानिक पोलीस स्टेशनकडे संबंधित बांधकामकर्ते यांनी जमा कराव्यात.

या अनुषंगाने अर्ज करणे व बांधकाम परवानगी देणे यासाठी महानगरपालिका,नगरपरिषदेने आपल्या पातळीवर विहित कार्यपद्धती (SOP) तयार करावी व त्याप्रकारे नियोजन करावे. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी सर्व संबंधितांनी करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

 357 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.