विलगीकरण केंद्रात क्षमतेपेक्षा जास्तीचा भरणा

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लिहिलेल्या पत्रात ठाण्याचे जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचा गंभीर आरोप

ठाणे : गेल्या आठवड्यात लोकमान्य नगर येथे झालेल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूमुळे आता असंख्य लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळपास ६४ लोकांना भाईंदर पाडा येथील विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले. मात्र या केंद्राची क्षमता केवळ ५० जणांची असून या ठिकाणी जवळपास ४०० जणांना ठेवले असल्याचा गौप्यस्फोट जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे हे विलगिकरण केंद्र करोना व्हायला कारणीभूत होतोय की काय असे बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात जगदाळे यांच्याकडे संपर्क साधला असता, केवळ लोकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावर हे पत्र लिहिले असून प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी दैनिक जनादेशला सांगितले. परंतु याआधीही या केंद्रात ठेवलेल्या लोकांकडून इथल्या अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत.
लोकमान्य नगर येथील मृत्यू झालेल्या करोनाबाधित रुग्णाबाबत प्रशासनाने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे अनेकांना धोका झाला आहे. त्यासाठी मागील ५ दिवस या परिसरातील संचारबंदी कडक करण्यात आली आहे. इथला परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने प्रशासनाने तातडीने त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० ते ७० लोकांना भाईंदर पाड्यातील विलगिकरण केंद्रात ठेवले आहे. परंतु याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त लोकांना ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच या आधीही येथे ठेवण्यात आलेल्या काही लोकांनी व्हिडीओ द्वारे इथला अस्वच्छपणा बद्दल तसेच सोयीसुविधांबद्दल तक्रारी केल्या आहेत. माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही याबाबत याआधी नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे जर हे सत्य असेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहायला हवे , असे नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना विचारले असता, भाईंदर पाड्यातील विलगिकरण कक्षाची एकंदर क्षमता ही जवळपास ७०० लोकांची आहे. मात्र सद्यस्थितीत त्याठिकाणी ४०० जण राहू शकतील इतकी व्यवस्था करून ठेवली असल्याचे सांगितले.

 425 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.