खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार होणार सवलतीच्या दरात

खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार महागडे असल्याने चाचणीसाठी नागरिक पुढे येत नसल्याचे महापौरांचे निरीक्षण

ठाणे : खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार घेणे सर्वसामान्य ठाणेकरांना परवडत नसल्याने आता महापौरांच्या सूचनेनंतर प्रशासनाच्या वतीने रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठीचा प्रस्ताव करण्याची शक्यता आहे . शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे त्यात शासनाच्या हॉस्पिटलवर ताण अधिक असल्याने नागरिक खाजगी हॉस्पिटलच्या महागड्या उपचारांमुळे चाचणी करण्यासाठीच नागरिक पुढे येत नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे .

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील काही खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आली असली तरी या हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उचाराचा खर्च सर्वसामान्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्नांच्या कुटुंबियांना परवडत नसल्याने खाजगी हॉस्पिटलच्या बिलामध्ये सवलत मिळावी अशी मागणी रुग्णांकडून होत आहे . विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी देखील यासंदर्भात पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे मागणी केली होती. ठाण्यात राज्य शासनाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ही दोनच मोठी रुग्णालये आहेत.शहरातील ही दोन मोठी हॉस्पिटल वगळता शहरात काही मोठी खाजगी रुग्णालये असून यातील अनेक रुग्णालये ही कोरोना रुग्णालये म्हणून ठाणे महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात आली आहेत. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार मोफत नसल्याने १४ दिवस उपचार केल्यांनतर येणारे बिल हे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याचे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तसेच स्वतः रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले आहे. खाजगी हॉस्पिटलची ओपीडी बंद केली असल्याने त्यांच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे . त्यामुळे सर्व खाजगी हॉस्पिटलला याच बिलावर अवलंबून राहावे लागत आहे.खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होण्यास आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण तयार नसतात, असा अनुभव आरोग्य यंत्रणेस आला आहे. त्यामुळे लक्षणे दिसत असूनही यापैकी अनेक रुग्ण चाचणी व उपचारांसाठी पुढे येत नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालये भाडय़ाने घेऊन तेथील रुग्णांच्या उपचारांचा भार उचलला आहे. ठाणे महापालिकेलाही हे करणे शक्य असून यासंदर्भात योग्य त्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत. जर खाजगी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळाले तर संशयित नागरिक चाचणी करण्यासाठी पुढे येतील असे महापौरांनी सांगितले.

 554 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.