मुख्यमंत्री ठाकरेंकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली पत्राद्वारे मागण्यांची यादी
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत यापार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशानुसार नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूलीवर तीन महिन्यासाठी कोणताही हप्ता भरू नये यासाठी सुट देण्यात आली. मात्र ही तीन महिन्याची सूट पुरेशी नसून ही मुदत सहा महिन्यापर्यत वाढविण्यात यावी आणि सरकारी बँकाबरोबरच सहकारी बँका, पतसंस्था यांनाही याबाबत आदेश द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्रान्वये केली.
तसेच नागरिकांच्या या थकित कर्जावरील व्याज केंद्र सरकारने भरण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय सध्या सर्वच जनता लॉकडडाऊनमुळे घरी बसलेली असल्याने केबल कंपन्यांनी तीन महिने केबलची आकारणी कमी स्वरूपात आकारणी करावी असे सांगत जीवनाश्यक वस्तुंबरोबरच मोबाईल इंटरनेटही जीवनावश्यक बनले आहे, त्यामुळे इंटरनेटची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांना सांगून जागोजागी व्हायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची सुचना करावी अशी मागणीही त्यांनी केली.
परदेशात शिक्षणासाठी गेलेले ५ ते ७ हजार विद्यार्थ्यांचे जेवणाचे आणि राहण्याचे हाल सुरु आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा अशी सूचना करत कोटा येथेही राज्यातील दोन हजार विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर परत आणण्यासाठी २५० बसेसची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी केली.
खाजगी डॉक्टर, हॉस्पीटल यांना पीपीईचे किट उपलब्ध करून द्यावे, कोरोना चाचणीचा खर्च पूर्णपणे महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट करून तसे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करत रेशनिंग दुकानातून अंगठ्याचा ठसा न घेताही धान्य देण्याबाबत शासन आदेश काढून सर्व दुकानदारांना तो पोहोचवावा आणि त्याची टीव्हीवर जाहीरात करावी अशी सूचना करत परराज्यातील मजुरांना त्यांच्या आधारकार्डावर धान्य देवून बांधकाम कामगारांप्रमाणे २ हजार रूपये मदत निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
543 total views, 1 views today