२००० रुपयांच्या मदतीसाठी अर्ज , दस्तावेज नको

बांधकाम मजूर, कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पध्दतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडुन कळविण्यात आले आहे.
सदरचे अर्थसहाय्य मिळवून देण्याकरीता कोणत्याही संघटना, संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून कामगारांना भूलथापा मारून कागदपत्रांची मागणी होत असल्यास त्यांनी कामगार विभागाकडे किंवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. कामगारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
जिल्हा कार्यालयस्तरावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातून राज्यातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना थेट (DBT) पध्दतीने रकमेचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हा कार्यालयाकडून सर्व नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांची यादी व बँकेचा तपशील मंडळस्तरावर मागवून अर्थसहाय्य वाटप करण्यात येत असून त्यास मंडळाच्या मुख्यालय स्तरावरून २० एप्रिल २०२० पासून सुरुवात झाल्याची माहिती इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चु.श्रीरंगम् यांनी दिली.

 583 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.