फणशीपाडा ग्रामस्थांचे अनोखे अन्नछत्र

परप्रांतीय कामगार आणि आदिवासींना दिलासा

अंबरनाथ : करोना संकटामुळे संचारबंदी जाहीर झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या लाखो कष्टकºयांना रोजची चूल पेटविणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या फणशीपाडा ग्रामस्थांनी सामूहिकपणे पुढाकार घेत परिसरातील कामगार आणि आदिवासींसाठी अन्नछत्र सुरू केले आहे. या अन्नछत्रातून दररोज बाराशे लोकांना दुपारचे जेवण पुरवले जाते. विशेष म्हणजे सरकारने अशा प्रकारची कम्युनिटी किचनची व्यवस्था सुरू करण्याआधी हे अन्नछत्र सुरू झाले असून लॉकडाऊन संपेपर्यंत ते सुरू ठेवण्याचा निर्धार फणशीपाडावासियांनी केला आहे.
फणशीपाडा ग्रामस्थांनी सुरू केलेले हे अन्नछत्र पाहून आनंदनगर येथील औद्योगिक संघटना असलेल्या ‘आमा’च्या पदाधिकाऱ्यानी त्यासाठी लागणारी मदत देण्याची तयारी दाखवली. ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे दररोज जातीने अन्नछत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून काय हवे नको ते पाहत आहेत. त्याचप्रमाणे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उद्योजक गुणवंत खरोदिया आदींनीही या अन्नछत्रात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे अन्नछत्र केवळ फणशीपाडा वासियांचे राहिलेले नाही. अंबरनाथ शहरातील अनेकांनी त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यास सुरूवात केली आहे. त्यात अंबरनाथ जयहिंद बँकेचे अध्यक्ष आणि उद्योजक विलास देसाई, रूपा देसाई-जगताप आदींचा समावेश आहे.
दररोज दुपारी १२ वाजता इथे जेवण तयार होते. परिसरातील आदिवासी आणि कामगार सामाजिक अंतर राखत रांग लावून इथून अन्नपदार्थ घेऊन जातात. डाळ-भात, खिचडी आणि पुलाव असे पदार्थ आलटून पालटून बनविले जातात. या आपत्तीच्या काळात गावकऱ्यानी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वजण कौतुक करीत आहेत.

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.