बळीराजा पिकवणार भाताबरोबर डाळ आणि भाजी

संकटाचे संधीत रूपांतर करण्यावर कृषी विभागाचा भर : रडून नाही तर लढून जिंकणार

बदलापूर : अतिवृष्टीचे संकट वरचेवर येत आहे. त्यातून बाहेर येत नाही तर यंदा कोरोना चे संकट उभे राहिले आहे. सर्वच व्यवहार ठप्प होताना बळीराजा मात्र संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या मनःस्थितीत दिसत असून राज्याचा कृषिविभागही सक्रिय झाला आहे. त्यामुळे यंदा बळीराजा भाताबरोबरच डाळ आणि भाजीचे पीक घेण्यासाठी तयारीला लागला आहे. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची सवय बळीराजाला वंशपरंपरागत लागली आहे. म्हणून आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे.
गेल्या वर्षात ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही तुट भरून काढण्यासाठी कोरोनाच्या संकटातही कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे कृतिशील व नवनवीन प्रयोग करणारे आहेत. त्यांना राज्याच्या कृषी विभागाचे सुद्धा पाठबळ मिळत आहे. त्यात लोकप्रतिनिधी सुद्धा पाठीशी ठामपणे उभा असल्यास प्रयोग यशस्वी होणारच. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. या बैठकीत या विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
भातशेतीच्या बांधावर तुरीचे पीक घेण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेताच्या बांधावर गवत मोठ्या प्रमाणात उगवत असते. या गवतामुळे फायदा होत नाही तर उलट नुकसानच होत असते. या गवताच्या जागी जर तुरी सह लाल डांगराचा लागवडीचा प्रयत्न केला तर भाताबरोबर डाळ आणि भाजी असे पीक घेता येईल. यंदा पहिल्यांदाच कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात हा प्रयोग करण्याचा विचार कृषी विभागाने केला आहे. शेताच्या बाजूला अनेक ठिकाणी ओसाड पडीक जमीन उपलब्ध आहे. अशा ओसाड जमिनीवर बांबू लागवडीसाठीही चाचपणी सुरू असून त्यासाठी काही भागांची नावे पुढे आली आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांचा भातासोबत डाळ आणि भाजीचाही प्रश्न मिटणार आहे.
गेले वर्ष ठाणे जिल्ह्यातील शेतीसाठी नुकसानदायक ठरले. अतिवृष्टीमुळे अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील बहुतांश भातशेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली होती. त्यावेळी आलेल्या करोनाच्या संकटात शेती संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भातशेती सोबतच आंतरपिकांबाबतही चर्चा झाली. गेल्या काही वर्षात भातशेतीच्या बांधावर तुर लागवडीचा प्रयत्न झाला होता. मात्र गेल्या काही वर्षात ही लागवड बंद झाली होती. मात्र बांधावरच्या पिकांमध्ये तुरीच्या लागवडीचा विचार व्हावा, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या भातासोबतच डाळीचाही प्रश्न मिटेल. एक कडधान्य शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध होईल, असेही मत त्यांनी मांडले.
बांधावर येणारे अनावश्यक गवत टाळण्यासाठी लाल डांगराची लागवडही करण्याचा विचार कृषी विभागामार्फत सुरू आहे. त्यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात पोषक वातावरण असल्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाच्या उल्हासनगर तालुका अधिकारी सुवर्णा माळी यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची माहिती जिल्हा बैठकीत सादर केली जाणार असून त्यासाठी बियाणांची उपलब्धताही पाहिली जाणार आहे, असेही माळी यांनी सांगितले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील भातशेती शेजारी असलेल्या वरकस, पडीक जागेवर बांबू लागवडीचाही प्रस्ताव आहे. अंबरनाथ तालुक्यामध्ये कारंद, येवे, बोराडपाडा अशा भागात बांबू लागवडीसाठी पोषक जमिन असल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. एच. पाटील यांनी दिली आहे.
कृषी विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुक्यात भाताबरोबरच तूरडाळ, लाल डांगर, बांबू अशा पिकांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते आहे.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.