बसमधील प्रवाशांचे सुरक्षित अंतर कमी झाले

कोरोनाची लागण वाढण्याचा धोका वाढला

बदलापूर : कोरोनाच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी सुरु असलेल्या बस सेवे मध्ये सुरुवातील असलेले सुरक्षित अंतर हळू हळू कमी कमी होत चालले आहे. आता तर चक्क उभे प्रवासी सुद्धा बसमधून प्रवास करू लागले आहेत. बदलापूर शहरातून सुटणाऱ्या अनेक बसमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे करोनाविरूद्धच्या लढाईत सेवा देणाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. यात वेळीच लक्ष घातले नाही तर बदलापूर मधील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे व्यक्त होत आहे. आमदार किसन कथोरे यांनी सुरुवातीला केलेली आणि आता बदलापूर पालिका प्रशासनाने केलेली सूचना म्हणजे त्या त्या कर्मचाऱ्यांची तेथेच निवासाची सोय करण्याची सूचना अमलात आणण्याची आवश्यकता वाढू लागली आहे.

सध्याच्या घडीला मुंबई व उपनगर शहरातील रूग्णालये, बँका, पोलिस ठाणे आणि महापालिकांमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण बदलापूर मध्ये वाढले आहे. शहरातील सुमारे तीन हजार कर्मचारी दररोज आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपली सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बदलापूर बस स्थानक परिसरातून दररोज महाराष्ट्र राज्य परिवहन, बेस्ट आदींच्या शंभरहून अधिक बस मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील शहरामध्ये ये जा करत असतात. या बसमधून हजारो प्रवासी दिवसभर ये जा करीत असतात. मात्र यात सकाळच्या सत्रातल्या बसमध्ये दोन प्रवाशांमधील सुरक्षित अंतर राखले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सकाळच्या सत्रात बसमधून मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे शासनाचे आदेश असतानाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसत आहेत.

बस सेवा सुरु करण्यात आली त्यावेळी कटाक्षाने एका सीट वर एकच प्रवासी बसू शकत होता आणि उभा एकही प्रवासी नसे. मात्र हळूहळू बहुतांश आसनांवर दोन दोन प्रवासी बसलेले दिसून येतात. तर काही प्रवासी उभ्यानेही प्रवास करताना पहायला मिळत आहे. याबाबत बसचे वाहक आणि चालक यांना सांगितल्यास तेही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. दोन प्रवाशांमधील सुरक्षित अंतर राखले गेले नाही तर या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच मुंबईत सेवा देण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाला आणखी धोका पोहोचू शकतो अशी भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत.

संचार बंदी सुरु झाली त्याच वेळी हा धोका ओळखून आमदार किसन कथोरे यांनी मुंबई, ठाणे व अन्य शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची त्या त्या आस्थापनांच्या ठिकाणी निवासाची सोय करण्याची सूचना केली होती. बदलापूर पालिका प्रशासनानेही आता हीच सूचना केली आहे. बदलापूर शहरात मुंबई मधून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असल्याने आता तरी यावर गांभीर्याने निर्णय घेण्याची चर्चा सोशल मीडियावर वाढू लागली आहे.

 584 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.