विजेची मागणी वाढल्यानेच यंत्रणा ठप्प
बदलापूर : वाढत्या विजेच्या मागणीला पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी मंगळवारी उल्हास नदीवरून शहरात येणाऱ्या विद्युतवाहिनीला पर्यायी वाहिनी जोडण्यात आली. त्यामुळे भविष्यातील ब्रेकडाऊन टाळता येणार असल्याचा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे . बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेची मागणी वाढल्यानेच वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे समोर आले आहे. रविवारी ही मागणी सर्वाधिक होती, त्यामुळे बदलापूर मध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती महावितरण अभियंत्यांनी दिली आहे.
कोरोना च्या महामारीला रोखण्यासाठी देशभरात संचार बंदी सुरू आहे. या संचार बंदीला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आणि कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी बदलापूर शहरातील नागरिक महिनाभरापासून घरात बसून आहेत. नागरिक घरीच असल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वातावरणात उष्णता प्रचंड वाढल्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा आधी जोमात सुरू राहत आहेत. वर्क फ्रॉम होम मुले संगणक यंत्रणा तसेच मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांचा वापर वाढला आहे. या सर्व गोष्टींसाठी वीज पुरवठा अधिक प्रमाणात लागत आहे. सध्याची महावितरणाचा पुरवठा कमी असून गेल्या काही दिवसांपासून ही मागणी 270 एम्पीयरपर्यंत या विक्रमी आकड्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या रविवारी बदलापूर शहरात संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली होती. त्यावेळी मागणी वाढल्यानेच यंत्रणा ठप्प पडल्याचे सिद्ध झाले होते. बदलापूर शहरातील बाजारपेठ, रमेशवाडी, हेंद्रेपाडा, बॅरेज रस्ता या भागातील मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळें यंत्रणा ठप्प पडल्यास ती पूर्वपदावर आणण्यासाठी मोठा काळ लागू शकतो. त्यामुळे या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी उल्हास नदीवरून उच्चादाब विद्युत वाहिनी टाकण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले होते. त्यासाठी बदलापूर पश्चिमेतील बाजारपेठ, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बॅरेज रस्ता या भागातील विद्युत पुरवठा मगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. या कामामुळे भविष्यात विजेची मागणी वाढली तरी विद्युत व्यवस्थेवर ताण येणार नाही, असा विश्वास महावितरणाच्या स्थानिक अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. या पर्यायी व्यवस्थेमुळे नागरिक वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी अपेक्षा बाळगून आहेत.
785 total views, 1 views today