हौशी शिकाऱ्यांची मजा; वनसंपदेला मात्र सजा

शिकाऱ्यांच्या उच्छादामुळे ग्रामीण भागातील जंगलपट्ट्यातील प्राण्यांचे जगणे मुश्कील झाले आहे

बदलापूर : कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीमुळे पशू, पक्षी आणि एकुणच पर्यावरणाला अनुकुल वातावरण निर्माण झाल्याचे चित्र शहरी भागात दिसत असले तरी जंगलपट्ट्यात मात्र काही उपद्रवी मंडळींकडून शिकारीचे प्रकार वाढीस लागल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी वणवे पेटविले जात असून त्यात अमूल्य अशी वनसंपदा नष्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरी भागात रस्त्यावर निर्धास्तपणे फिरणाऱ्या वन्यप्राण्यांची छायाचित्रे समाज माध्यमांवरून व्हायरल होत असली तरी शिकाऱ्यांच्या हौशी उच्छादामुळे ग्रामीण भागातील जंगलपट्ट्यातील प्राण्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शिकाऱ्यांची हौस भागते मात्र वनसंपदा आणि प्राण्यांना त्यांची झळ सहन करावी लागत आहे. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगल पट्ट्यात वृक्षारोपण केले जाते. मात्र उन्हाळ्यातील या मानवनिर्मित वणव्यांमुळे त्या हिरव्या मोहिमेला हरताळ फासला जात आहे.
संचार बंदी असल्याने सध्या सर्व प्रकारची कामे बंद आहेत. त्यामुळे कामधंदा नसल्याने वेळ घालविण्यासाठी जंगलात शिरून शिकार करण्याच्या प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. काहीजण पोटासाठी तर काही निव्वळ हौसेपोटी जंगलाचा विध्वंस करीत आहेत. त्यासाठी वणवे लावून वनसंपदा जाळून टाकली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र जंगल संपदेचा हा ऱ्हास थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
मुरबाड परिसरातील जंगलात गेल्या पंधरा-वीस दिवसात तीनदा वणवे लागले होते. परिसरातील प्राणीमित्रांनी ते विझविले. त्यापैकी शनिवारी लागलेला वणवा मोठा असल्याने वन विभागाच्या वणवा विरोधी पथकाची मदत घेण्यात आली. वणवा विझल्यावर प्राणीमित्रांना ओहोळाच्या कपारीत रानडुकाराची दोन पिल्लं सापडली, पण त्यांच्या आईचा तिथे ठावठिकाणा नव्हता. अखेर अंधार पडायच्या वेळी आईची चाहूल लागली आणि मायलेकरांची भेट झाली.
गेल्या आठवड्यात मुरबाडच्या जंगलात प्राणीमित्रांना हरणाची दोन पिल्ले मिळाली. वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांच्या सहयोगाने संजय गांधी राष्ट्रीय उद्याानाच्या पुनर्वसन केंद्रात त्यांची सुखरूप रवानगी करण्यात आल्याची माहिती प्राणिमित्र आणि अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी दिली.
मुरबाड परिसरात समृद्ध वनसंपदा आहे. शिकारीच्या क्षुद्र छंदापायी ती जाळून टाकू नका. वन संपदा अशी ओरबाडून घेण्यापेक्षा डोळसपणे संकलन केले, तर जंगलातून अमूल्य धन मिळते. वर्षाच्या बाराही महिने जंगल काही ना काही देत असते. उन्हाळ्यात जंगलात करवंद, जांभळं, आंबे आदी रानमेवा मिळतो. पावसाळ्यात रानभाज्या मिळतात. अनेक आजारांवर उपयोगी ठरणाऱ्या वनौषधी जंगलात मिळतात. आम्ही याविषयी ग्रामीण भागातील तरुण पिढीला हाताशी धरून प्रबोधन करीत असल्याचे अश्वामेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात जंगलात वणवे लागण्याच्या घटना घडल्या. शिकारीच्या तक्रारीही आल्या. मात्र अद्यााप शिकार झाल्याचे आढळून आलेले नाही. आमच्या विभागातर्फे जंगलात गस्त सुरू आहे. वणवा विरोधी पथकही डोळ्यात तेल घालून पहारा देत असल्याचे मुरबाड पश्चिमचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी सांगितले.

 438 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.