” लक्ष्य कोरोनाचे …शस्त्र कुंचल्याचे….!”

फेसबुक लाईव्ह च्या मध्यामांतून , पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याची साकारली तैल चित्र

बदलापूर : कोरोनाच्या या संचार बंदीच्या काळात प्रत्येक जण काहींना काही करीत आहे. कोरोनाच्या या युद्धात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस सर्वच जण लढत आहेत. काही कलावंत देखील आपल्या कलेच्या माध्यमातून या लढ्यात सहभागी झालेले दिसत आहेत. घरात राहून हि लढाई जिंकायची आहे. त्यासाठी कलाकारही विविध प्रकारे आवाहन आणि प्रयत्न करीत आहेत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार, बदलापूरचे रहिवासी सचिन जुवाटकर यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चित्रे रेखाटली आहेत. सचिन जुवाटकर यांचे या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अगदी देश परदेशातून याचे स्वागत होत आहे. चित्र साकारतांना पार्शवसंगीत हे देशभक्तीपर गीत लावले जाते. देशभक्तीपर गीते लावल्याने देशभक्ती, विरंगुळा आणि मनोरंजन हि त्रिसूत्री जपली जात असल्याचे सचिन जुवाटकर म्हणतात.
बदलापूरात राहणारे आंतराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी ” लक्ष्य कोरोनाचे …शस्त्र कुंचल्याचे….!” या संकल्पनेतून चित्र साकारून लोकांचे मनोरंजन आणि तणाव कमी केलाय. आज लॉकडाऊन च्या काळात लोकांनी घरी सुरक्षित बसावे यासाठी त्यांनी फेसबुक लाईव च्या माध्यमातून आपली कला सादर केली. जुवाटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तैल चित्र साकारले आहे. हजारो लोकांनी घरीच बसून मोबाईल आणि संगणकावर हे चित्र लाईव्ह साकारताना पाहण्याचा आनंद घेतला.
विशेष म्हणजे आठ आठ तास सलग काम करून त्यांनी ही दोन चित्र रेखाटली आहेत. प्रत्येक रविवारी एक चित्र असा हा त्यांचा उपक्रम आहे. पहिल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारले. गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तैलचित्र साकारले. येणाऱ्या रविवारी राज ठाकरे, शरद पवार आदी मान्यवरांची तैलचित्रे साकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दर रविवारी एक तैलचित्र साकारण्याचा त्यांचा मनोदय आहे. या उपक्रमासाठी खर्च होत असतो आणि या संचार बंदीच्या काळात असा खर्च तसा न परवडणाराच म्हणावा लागेल. मात्र यातूनही काही कदरदान अशी चित्रे विकत घेण्यास तयार आहेत हीच जमेची बाजू असल्याचे सचिन जुवातकर म्हणाले.
तैल रंगात ही चित्र साकारण्याचे आव्हान जुवाटकर यांनी लीलया पेलले आहे. खर तर ओल्या रंगांवर डिटेल करणे तसे फारच कठीण आहे. मात्र मुळ पेंन्सिल स्केच पासून रंगात चित्र निर्मीतीची ही संपुर्ण प्रोसेस करून त्यांनी ही सुंदर चित्र सकारली आहेत. या पूर्वी सुद्धा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र साकारले होते. आता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चित्रे रंगवत असताना साडेतीन हजार रसिक लाईव्ह एकावेळी पहात होते हे अनपेक्षित असल्याचे सचिन जुवाटकर म्हणतात. देश परदेशातून हि कला रसिक पहात होते हे पाहून आपल्याला आणखी स्फूर्ती मिळाली असल्याचे जुवाटकर म्हणाले. रसिकांना हि कल्पना प्रचण्ड आवडल्याची प्रतिक्रिया येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे साकारताना नवनवीन कलाकार यातून तयार होत आहेत. काही अनपेक्षित लाभ यातून मिळत आहेत. अनेकजण आपापल्या घरी टीव्ही वर लावून लाईव्ह कार्यक्रम पहात होते आणि ते पहातानाचे फोटो अनेक रसिकांनी आपणास पाठवले आहेत.
फेसबुक लाईव्ह चित्र साकारताना पार्शवसंगीत देशभक्ती पर गीते लावली असल्याने देशभक्ती, विरंगुळा आणि तणावमुक्ती हि त्रिसूत्री जपली असल्याचे सचिन जुवाटकर यांनी सांगितले. संचारबंदी लक्षात घेऊन या वेळी घरात मी आणि एक सहकारी असतो. बाकी कोणीही नसते. सहकारी असलेला मित्र देशभक्तीपर गीते ऐकून म्हणतो कि, आपण सरहद्दीवर हातात शस्त्र घेऊन उभे आहोत असेच वाटते. त्याची हि प्रतिक्रिया बरेच काही सांगून जात असल्याचे सचिन जुवाटकर यांनी सांगितले. आपला हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांनी घरात बसून पहावा म्हणजे तितका वेळ कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी आपण आपले कर्तव्य थोडे तरी पार पाडू शकलो यात समाधान आहे. यातून खर्च वजा जाता जे उत्पन्न मिळते त्यातून गरिबांना आणि मुक्या प्राण्यांना अन्नदान देत असल्याचे सचिन जुवाटकर यांनी सांगितले.
सचिन जुवाटकर यांच्या या उपक्रमाचे भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष व सभापती संभाजी शिंदे आणि नगरसेवक किरण भोईर यांनी त्यांच्या घरी जाऊन कौतुक केले आहे.

 687 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.