नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या आवाहनाला अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबरनाथ : कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात बळकट करण्यासाठी, मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात देणगीदारांची रांग लागली होती. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दीडशेहून अधिक नागरिक व व्यापारी यांनी पंधरा लाखाचे वर निधी यावेळी जमा करण्यात आले.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारबरोबर आपण सर्वांनी देखील एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि आपल्या बंधू-भगिनींना सहाय्य केले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजनेमध्ये सहकार्य करून ही योजना सफल करण्यात खारीचा वाटा उचलू, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केले होते.
अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे स्वतः नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरसेवक एड. निखिल वाळेकर, गटनेते राजेश शिर्के, नगरसेवक पद्माकर दिघे, युवा सेनेचे शहर प्रमुख व सभापती उत्तम ऐवळे, व्यापारी सांघाचे अध्यक्ष खानजी धल, मुस्लिम जमातचे असिफ पठाण, मेहमूद शेख, प्रकाश डावरे, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चे माजी अध्यक्ष दत्ता घावट, ईश्वरलाल चव्हाण, डॉ. गणेश राठोड, मिलिंद गान, संजय गावडे, यांच्यासह अंबरनाथ शहरातील सुमारे १५७ सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधीत” धनादेश जमा करून सुमारे १५ लाख ५७ हजार ९७७ रुपयांचा निधी जमा करत खारीचा वाटा उचलला आहे.
महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचा जे संकट आलेले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून नागरिकांना दिलासा देत आहेत. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उत्तम काम करीत आहेत. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा या नात्याने व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”ला मदत करण्याकरिता अंबरनाथकरांना आवाहन केले होते, या आवाहनाला अंबरनाथकरांनी प्रतिसाद देत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”त धनादेश देत मदत केलेली आहे. सुमारे ११ लाखांपर्यंत निधी जमा होईल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात जास्त निधी जमा झाला असल्याचे नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हस्ते सहकार्य करणाऱ्या सर्व अंबरनाथकरांचे आभार देखील मनीषा वाळेकर यांनी मानले.
601 total views, 1 views today