सॅनिटेशन डोम-टनेल अशास्त्रीय, व्यक्तींना अपाय होऊ शकतो

महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई : परदेशात कोरोनापासून बजाव करण्यासाठी सॅनिटेशन डोम-टनेल उभारून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्हीडीओ मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ते व्हीडीओ पाहून राज्यातील पोलिस दलाकडून मोठ्या प्रमाणावर असे डोम-टनेलची निर्मिती करून जागोजागी लावण्यात आले. मात्र अशा डोम-टनेलला कोणताच शास्त्रीय आधार नसून त्यापासून कोरोना विषाणू नष्ट होत नाही तर त्या व्यक्तीलाच अपाय होण्याची शक्यता असल्याची गंभीर बाब बाब राज्याच्या आरोग्य विभागाने एक परिपत्रक काढत सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.
राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांनी अनेक ठिकाणी स्वत:च्या सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून मोठ्या प्रमाणावर आपल्या पोलिस व्हॅनला सॅनिटेशन टनेल मध्ये रूपांतरीत करून ठिकठिकाणी उभ्या केल्या. या गाड्यांचे रूपांतरण करण्यासाठी हजारो रूपये पोलिस दलाकडून खर्च करण्यात आले. मात्र आता या सॅनिटेशन डोम-टनेलमधून गेल्याने सदर व्यक्तीच्या अंगावर किंवा कपड्यावर जर कोरोनाचा विषाणू बसला असेल तर तो विषाणू मारला जात असल्याबाबतचा शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे अशा डोम किंवा टनेलची निर्मिती करू नये असे आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
याचबरोबर केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकातही अशा डोम आणि टनेलला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.

 484 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.