लॉकडाऊन कालावधी संपल्यावर मलेशिया…….भारतीयांसाठी उत्तम पर्यटन स्थळ – अजय निक्ते

सध्या जगभरात अनेक देशांत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन कालावधी सुरू आहे. मात्र हा कालावधी संपल्यानंतर अनेकजण कुटुंबा बरोबर परदेशी जाण्याच्या प्लॅन आखतील.
परदेशी पर्यटनाची आवड आणि इच्छा असणाऱ्या भारतीयांसाठी मलेशिया हा  पर्याय , उत्तम आणि तुलनेने स्वस्त पर्यटन स्थळ म्हणून सिद्ध होत आहे. खास भारतीय पर्यटकांसाठी मलेशिया सरकारने व्हिसा फी कमी केल्याने मलेशिया मधील रेन फॉरेस्ट , जगप्रसिद्ध ट्वीन टॉवर ,  जमिनी खालील मत्सालय , नितांत सुंदर सागरी किनारे , शॉपिंग मॉल हे आता भारतीय पर्यटकांच्या आवाक्यातील डेस्टीनेशन म्हणून झपाट्याने चर्चेत येत आहेत.

कौलालांपुर शहराचे विहंगम दृश्य
कौलालांपुर शहराचे विहंगम दृश्य

 मलेशिया च्या राजधानीत , कौलांलपुर येथे असणारे पेट्रोनास ट्वीन टॉवर हे जगभरातील पर्यटकांसह भारतीयांचे  देखील कायमच आकर्षण ठरले आहेत. ८८ मजले असणारी ही इमारत म्हणजे स्थापत्यशास्त्राचा चमत्कारच म्हणावा लागेल. या इमारतीला लागूनच कौलालंपुर सिटी सेंटर या प्रशस्त ठिकाणी अप्रतिम असे जमिनी खालील मत्सालय बांधण्यात आले आहे. तब्बल साठ हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये उभारण्यात आलेल्या या मत्सालया मध्ये ९० मीटर लांबीचा पाण्याखालील भोगदा असून २५०  विविध प्रकारच्या माश्यांच्या  प्रजाती तर पाच हजाराहून अधिक  जातीचे जमिनीवरील आणि पाण्याखालील इतर प्राणी , कीटक व जलचर आहेत.  ट्वीन टॉवर आणि मत्सालय म्हणजे जणू काही मलेशिया ची एक जागतीक ओळख बनली आहे. जगातील सर्वात जुना इतिहास असलेले रेन फॉरेस्ट म्हणजे तमान नेगारा  हे एकमेव जंगल  मलेशिया येथे आहे.   पर्यटकांची आवड लक्षात घेऊन  तब्बल बारा रेन फॉरेस्ट रिसॉर्ट मलेशियात विविध भागां मध्ये  उघडण्यात आली आहेत. जंगल सफारी ची आवड आणि निसर्गाला जवळून जाणून घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या रेन फॉरेस्ट ना आणि रिसॉर्ट ना भेट देतात.
जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मलेशियन सरकार तर्फे  पर्यटन खात्याने खास  जगातील सर्वात मोठे आणि आकर्षक “शोपिया शॉपिंग मेगाफेयर ” वर्षभरात वेगवेगळ्या कालावधीत सुरु केले आहे. त्याच बरोबर संपूर्ण मलेशिया मध्ये विविध भागात ड्युटी फ्री पोर्ट शॉपिंग सेंटर  सुरु केले असून जगप्रसिद्ध उत्पादने विक्रीस ठेवली आहेत.  गेल्या काही वर्षांत मलेशिया हा देश जगातील पहिल्या पाच उत्तम शॉपिंग देशात गणला जात असून  , मलेशियन पर्यटन खात्याने  उत्तम शॉपिंग देशात अग्रस्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

चहूबाजूंनी समुद्र असल्याने मलेशियाला नितांत सुंदर असे शेकडो समुद्र किनारे लाभले आहेत. निळेशार पाणी , पांढरी आणि चॉकलेटी रंगाचे मिश्रण असलेली स्वच्छ वाळू आणि हिरवेगार वनश्रीने नटलेले समुद्र किनारे म्हणजे लाखो पर्यटकांच्या मौजमस्तीचे आवडते ठिकाण आहे.  विविध प्रकारचे साहसी  सागरी खेळ हे या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे.

 भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये कपात करून मलेशिया सरकारने येथील पर्यटकांना आकर्षित केले आहे. भारतीय पद्धतीचे जेवण येथील अनेक उत्तम रेस्टॉरंट मध्ये मिळत असल्याने परदेशात पर्यटकांची होणारी आबाळ मलेशिया मध्ये होत नाही. फिरण्यासाठी विविध आकर्षक  आणि सुरक्षित पर्याय संपूर्ण मलेशिया मध्ये उपलब्ध असल्याने भारतातील तरुण वर्ग , नव विवाहित जोडपी आणि संपूर्ण कुटुंबासाठी देखील  हा  देश उत्तम पर्यटन पर्याय म्हणून पुढे येत आहे.

लेखक
अजय निक्ते
पत्रकार , ट्रॅव्हल ब्लॉगर आणि अभिनेते

 586 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.