जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली यादी
ठाणे : ठाणे जिल्हयातील सर्व ६ महानगरपालिका, २ नगर परिषदा, २नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने आपापल्या कार्यक्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील क्षेत्र सीमांकित करून प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
.१७ एप्रिल २०२० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.3 (i) व (ii) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र, नवी मुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र, उल्हासनगर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र ,भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र , अंबरनाथ नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र, कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र, शहापूर नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र,
मुरबाड नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र, ठाणे जिल्हा परिषदेचे संपूर्ण क्षेत्र (ठाणे ग्रामीण )ही प्रतिबधित क्षेत्र असणार आहेत.
उपरोक्त प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (Containment Zone) १७ एप्रिल २०२० रोजीच्या शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती लागु राहणार नाहीत. व या बाबींवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागु राहतील. सदरच्या प्रतिबंधात्मक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
सदरचे आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ व ५६, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता, (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही श्री नार्वेकर यांनी दिला आहे.
675 total views, 1 views today