कोरोनाचा सामना करण्यासाठी ॲान कॅाल तज्ज्ञ डॅाक्टरही येणार

१२ वैद्यकिय व्यावसायिकांची तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती

दिवसांतून दोन वेळा होणार रूग्णांची तपासणी, तीन पाळ्यांमध्ये काम , महापालिका आयुक्तांचा निर्णय

ठाणे : कोव्हीड-१९ साथ रोगाच्या परिस्थितीशी प्रभावीपणे सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज १२ खासगी वैदयकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती केली. त्याचबरोबर डॅा. शैलजा पिल्लई यांची ॲान कॅाल तज्ज्ञ ड्राक्टर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची नियुक्ती ही जून महिन्यापर्यंत अथवा कोव्हीड-१९ची साथ संपेपर्यंत करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महापालिका क्षेत्रात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीत रूग्णांना दाखल करण्यासाठी सफायर हॅास्पीटल, हॅाटेल लेरिडा, हॅाटेल जिंजर या दोन हॅाटेलसह भायंदरपाडा येथील डी बिल्डींग निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार हॅाटेल लेरिडा, हॅाटेल जिंजर तसेच भायंदरपाडा डी बिल्डींग येथे लक्षणे नसलेल्या बाधीत रूग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी रूग्णांना डॅाक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
या सर्व ठिकाणी वैद्यकिय अधिकाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी तातडीची बाब आणि कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी १२ बीएएमएस खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची रूपये ४० हजार इतक्या एकत्रित मानधनावर माहे जून महिन्यापर्यंत अथवा कोव्हीड-१९ साथ रोगाची साथ संपेपर्यंत नेमणूक करण्यात आली आहे. सदरचे वैद्यकीय अधिकारी तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत.
या तीन ठिकाणी प्रत्येकी ८ तासासाठी १ खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ तसेच रात्री ११ ते सकाळी ७ या तिन्ही सत्रामध्ये प्रत्येकी १ खाजगी वैद्यकीय व्यावसायिकामार्फत कामकाज पाहण्यात येणार आहे.
हॉटेल लेरिडामध्ये डॉ. तेजस थोरात, डॉ. मनिष सिंग, डॉ. आशिष सिंग, डॉ. मुकेश यादव यांची हॉटेल जिंजर येथे डॉ. सौरभ बचाटे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. जयंत जाधव डॉ. विनोद सिंग तर भाईंदरपाडा येथील डी इमारतीमध्ये डॉ. सोनिया इंगळे, डॉ. शैलेश इंगळे, डॉ. समिधा गोरे, डॉ. मधुरा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या अधिपत्याखाली दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना दिवसातून किमान २ वेळा तपासणी करुन आवश्यकतेनुसार उपचार करणे आवश्यक आहे. तसेच एखादा रुग्ण गंभीर झाल्यास तातडीने डॉ. शैलजा पिल्लई यांच्याशी संपर्क साधून योग्य ती पुढील कार्यवाही करणे व आवश्यक ते उपचार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत.

 607 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.