स्वातंत्र्य सैनिक रा. वि. भुस्कुटे यांचं निधन

सेवा निवृत्ती नंतरही आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांचा लढा सुरु होता.

अंबरनाथ : अंबरनाथ मधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व निवृत्त तहसीलदार रामचंद्र विनायक उर्फ रा. वी. भुस्कुटे (९५) यांचे माणगाव येथे मुलीच्या घरी पहाटे साडे चारच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विमल, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू पणतू असा परिवार आहे.
कोरोनाच्या संचार बंदीच्या पार्शवभूमीवर, दुपारी त्यांच्या पार्थिवावर माणगाव येथे भावपूर्ण वातावरणात मोजक्या सात ते आठ लोकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियंका कांबळे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून भुस्कुटे यांच्या पार्थिवावर पुष्पमाला अर्पण केली. सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्काताई महाजन यावेळी उपस्थित होत्या.
रा. वि. भुस्कुटे हे अनेक वर्षांपासून अंबरनाथ मध्ये वास्तव्यास होते. अलीकडेच ते पुणे नंतर वांगणी आणि काही दिवसांपूर्वी माणगाव येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास गेले होते. महसूल खात्यात त्यांनी ३३ वर्षे सेवा केली. ३१ ऑक्टोबर १९८३ रोजी तहसीलदार पदावरून ते निवृत्त झाले होते. सेवा निवृत्ती नंतरही आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांचा लढा सुरु होता. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजसेवा सुरु ठेवली होती. वयाच्या ९५ व्या वर्षीही ते सक्रिय होते. विद्यार्थी दशेपासूनच ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. १९४२ च्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आंदोलन हे त्यांच्या रक्तात भिनले होते. म्हणूनच स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्या नंतरही त्यांनी तुरुंगवास भोगला होता.
रा. वि. भुस्कुटे यांच्या निधनाचे वृत्त कळताच अंबरनाथमध्ये शोक व्यक्त होत आहे. नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आदी मान्यवरांनी भुस्कुटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 639 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.