दोन ठिकाणी विशेष केंद्राची सुरूवात : खाजगी डॉक्टरांच्या मदतीने पालिकेचा उपक्रम
बदलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानंतर बदलापुर शहरात तापाच्या रूग्णांसाठी विशेष आरोग्य केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्यात आले असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची मदत यावेळी मिळणार आहे. येथे फक्त तापाच्या रूग्णांना तपासले जाणार आहे.
कोरोना च्या रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढते आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या अनेक रूग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. त्यातही अशा रूग्णांची तपासणी सध्याच्या घडीला राज्यात मोजक्याच ठिकाणी केली जाते आहे. त्यामुळे अशा रूग्णांची कोरोना चाचणी करण्यापूर्वी त्यांच्यात काही लक्षणे दिसतात का हे तपासणे महत्वाचे आहे. राज्यभरात विविध शहरांमध्ये तापाच्या रूग्णांसाठी विशेष आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाते आहे. बदलापूर पालिकेच्या माध्यमातून बदलापूर शहरात दोन केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.
बदलापूर पूर्वेतील काटई कर्जत महामार्गावर कात्रप चौकाच्या शेजारी पालिकेच्या आधार नोंदणी केंद्रात हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. पश्चिमेतील भाजी मंडई परिसरात सहकार हॉटेलच्या मागच्या बाजूस असलेल्या पालिकेच्या डिजीटल लायब्ररीसाठी उभारलेल्या वास्तूमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. पश्चिमेतील हे केंद्र सकाळी ९ ते दुपारी १२ या काळात सुरू राहणार असून पूर्वेतील केंद्र सायंकाळी ५ ते रात्री ८वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे. मानधनावर पालिकेने नेमलेल्या एका डॉक्टरसह इंडियन मेडीकल असोसिएशनचे दोन डॉक्टर या ठिकाणी सेवा देणार आहेत. या ठिकाणी फक्त तापाचे रूग्ण तपासले जाणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले आहे
525 total views, 1 views today