आत्महत्या देखील करता येत नाही : कर्जही फेडता येत नाही
बदलापूर : “निसर्गाने झोडपले, आणि राजाने मारले तर बळीराजाने न्याय कोणाकडे मागायचा” अशी अवस्था अंबरनाथ तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्यांची झाली आहे. एका मागून एक आपत्ती त्यांच्या वाटेला येत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन सूरु केल्याने दोन पैसे गाठीला येतात. मात्र यंदा २६ जुलै आणि ४ ऑगस्ट २०१९ रोजी आलेल्या महापुरामुळे आणि त्यातून सावरत नाही तर कोरोना रुपी आलेल्या संकटामुळे या उद्योग करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. स्वतः इतकी वर्ष मेहनत करून, जीवापाड जपून वृक्ष संपदा वाढवल्याने आणि त्याच बरोबर जोपासलेल्या मजूर कुटुंबियांना सोडून आत्महत्या सुद्धा करता येत नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. “आई जेवू घाले ना, आणि बाप भीक मागू देई ना” अशीच काहीशी अवस्था त्यांची झालेली आहे.
बारा महिने वाहणाऱ्या उल्हास आणि बारवी नदी काठी असंख्य शेतकरी शेती करतात. तर काही शेतकरी हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन करीत आहेत. कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडल्यासारखेच दिसत आहे. त्यांना कोणत्याही सवलती शासन देत नाहीत असेच चित्र दिसत आहे. कृषी पर्यटन केल्यामुळे या परिसरात पर्यावरण रक्षणाचे फार मोठे काम होत आहे. त्याच बरोबर असंख्य बेरोजगार कुटुंबाना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. हे बहुतेक सर्व कृषी पर्यटन व्यवसाय करणारे शेतकरी हे स्थानिक भूमिपुत्र असून प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आहेत. असे असताना शासनाने त्यांना साथ देणे अपेक्षित आहे.
२६जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी महापुरात बहुतेक कृषी पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मानसिकताही तयार केली कि यंदा एप्रिल, मे व जून महिन्यतात कृषी पर्यटनात थोडी भर निघेल. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. फेब्रुवारी महिन्यातच त्यांना चाहूल लागली कि यंदाही व्यवसाय होण्याची शक्यता नाही.
कोरोना संचारबंदीमुळे ज्या प्रमाणे उद्योग व्यवसायाना फटका बसला तसाच तो शेतीपूरक उद्योगांनाही फटका बसला आहे. त्यात कृषि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. उल्हास आणि बारवी नदीकिनारी असलेल्या अनेक कृषि पर्यटन केंद्रांमध्ये वर्षभर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी विविध ठिकाणांहून नागरिक हमखास येत असतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत कृषि पर्यटन क्षेत्रात शहरातील नागरिक आपल्या कुटुंबियांसमवेत येत असतात. अंबरनाथ तालु्क्यातील वांगणी जवळील काराव गावातील देशमुख बंधूंच्या कृषि पर्यटन केंद्रामध्ये तर वर्षभर हजारो पर्यटक येत जात असतात. यंदा या परिसरात अक्षरश: शुकशुकाट आहे.
अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात वर्षा सहलींसाठी कुणी आलेच नाही. त्यामुळे तो सीझन तर वाया गेलाच शिवाय महापुरामुळे त्यांच्या कृषी पर्यटन केंद्राची पूरती वाताहत झाली. अनेक वर्षांपासून मोठ्या मेहनतीने वाढवलेली मोठी झाडेही वाहून गेली त्याच बरोबर पर्यटकांसाठी तयार केलेली विविध खेळणी यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या की कृषि पर्यटनातून चार पैसे सुटतील, अशी आशा कृषि पर्यटन केंद्राचे संचालक बाळगून होते. मात्र ‘कोरोना’ संचारबंदीमुळे त्यांची ही संधीही वाया गेली आहे.
यंदा वातावरण सुद्धा विचित्र झाल्याने या परिसरातील आंब्यांना पाहिजे तसा मोहोर आला नाही. तर काही ठिकाणी आलेला मोहोर गळून पडला. त्यामुळे आंब्याचा सिझन वाया गेला. एकही आंबा हाती लागला नाही. हे कमी कि काय त्यात कोरोनाचा संचार बंदीचा जोरदार फटका त्यांना सहन करावा लागत आहे. आंबा आला नसला तरी फणस व चिकू चे पीक चांगले आहे. दर वर्षी व्यापारी त्यांच्या शेतावर येऊन फणस, चिकू घेऊन जात असत. त्यामुळे त्यांना दोन पैसे सूटत असत. मात्र यंदा कोरोनाच्या संचार बंदीमुळे हे उत्पादन अक्षरशः जागेवर पडून सडू लागले आहे. कृषि पर्यटन केंद्रात येणारे नागरिक घरी जाताना शेतात पिकणारा भाजीपाला, फळे विकत नेतात. जागेवरच माल विकला जात असल्याने शेतकर्याना ते फायदेशीर ठरते. केंद्रात पर्यटकच नसल्याने यंदा त्यांचा शेतमालही वाया जात आहे.
कृषि पर्यटन केंद्र चालवण्यासाठी बहुतेकांनी महिना आठ, दहा हजार रूपये वेतनावर माणसे कामाला ठेवली आहेत. संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प असला तरी या कामगारांना त्यांना सांभाळावे लागते. शिवाय पर्यटन केंद्रात देखभाल दुरूस्तीची कामेही नियमित करावीच लागतात. यात कामावर ठेवलेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा सुद्धा हे शेतकरीच सांभाळ करीत असतात. उत्पन्न असो किंवा नसो त्यांना ते सोडत नाहीत. याचे कारण म्हणजे इतक्या वर्षांपासून त्यांचेशी कौटुंबिक नाते तयार झाले आहे. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी हे शेतकरीच घेत असतात.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरु केले. त्यातून उत्पन्न बरोबरच वृक्षवल्ली जोपासली जाते. जमिनीची धूप न होता पर्यावरण चांगले राखले जाते. मात्र यंदा कृषि पर्यटन केंद्रांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. महापुरामुळे अतोनात नुकसान झाले असल्याने गेले वर्षभर पर्यटक नाहीत. पर्यटक नसल्याने उत्पन्न अजिबात नाही मात्र देखभालीचा खर्च अखंड पणे होतोय. कोरोनाच्या संचारबंदीमुळे ऐन हंगामात पर्यटक नाहीत. शेतातील फळेही पडून आहेत. शासनाने आमच्या शेतातला भाजीपाला आणि फळे शेजारच्या गावात नेऊन विकण्याची व्यवस्था तरी करावी किंवा आम्हाला तशी परवानगी द्यावी. म्हणजे त्यातून आमच्या उत्पन्नात थोडी का होईना भर पडेल. आमच्या शेतात पिकलेला शेतमाल हा संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने असल्याने नागरिकांना चांगला भाजीपाला व फळे मिळतील. यासाठी शासनाने तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची कळकळीची विनंती वांगणी जवळील काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे मालक दिलीप देशमुख यांनी केली आहे.
515 total views, 2 views today