घरगुती वीज ग्राहकांना ऑनलाइन किंवा मे महिन्यात बिल भरण्याची सवलत
दंड न आकारण्याचा महावितरणचा निर्णय
मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे घरगुती वीज ग्राहकांना आपले वीज बील भरण्यासाठी ऑनलाईन वीज भरा किंवा थेट मे महिन्यात थकीत बीले भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच स्वत:चा मीटर रिडींग घेवून पाठविले असेल तर वीजग्राहकांना जेवढा वीजेचा वापर केलाय तेवढेच बील आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने घेतला आहे.
सद्यपरिस्थितीत वीज बीलाची छपाई आणि त्याचे घरोघरी वाटप करता येणे शक्य होत नाही. तसेच नागरिकांना बीले भरण्यासाठीची केंद्रेही उघडी ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना औद्यागिक आणि वाणिज्यिक वीजग्राहकांना देण्यात आलेल्या मुदतीप्रमाणे मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनुसार मार्च महिन्याचे बील लॉकडाऊन संपल्यानंतर १५ मे पर्यत भरता येणार आहे. तर एप्रिलचे बील ३१ मे पर्यत भरता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ज्या ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरायचे आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईटवर किंवा गुगल प्ले स्टोअरवर एमएसईडीसीएलचे (MSEDCL) अँप डाऊनलोड करून त्यामार्फत मीटर रिडींग सादर करून तितकेच बील भरता येणार आहे किंवा सरासरी वीजबीलाचा भरणाही करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/ मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे-२०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.मार्च-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक १५ मे असणार आहे. तर एप्रिल-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक ३१ मे-२०२० राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे, त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
778 total views, 1 views today