वाटसरुंची स्वतंत्र व्यवस्था करा

कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे वेधले संघर्ष समितीने लक्ष

पनवेल : राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे इतर राज्यातील निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रात सरसकट नागरिकांना जमा करण्याची मोहिम आता महागात पडू शकते. त्यातून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका असल्याने नव्या वाटसरुंना पकडून स्वतंत्र निवारा केंद्रात ठेवण्यात यावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.
लॉकडाउनची वाढलेली मुदत आणि मुंबई, ठाणे शहरांना पडलेला कोरोनाचा वेढा पाहता गावाकडच्या ओढीने कोकण, गोवा, पुणे आणि दाक्षिणात्य राज्यातील नागरिक रेल्वे रूळ तसेच डोंगर कपारीतील वाट तुडवत निघाले आहेत.
पनवेल शहराच्या सर्व सीमा पोलिसांनी रोखून धरल्याने त्यांना रेल्वे रूळ आणि ग्रामीण भागातील मळलेली पायवाट जवळची वाटत आहे. त्यात रेल्वे पोलिस, सीआरपीएस जवान त्यांना मज्जाव करत नसल्याने रेल्वे रुळाचा मार्ग त्यांना सुरक्षित ठरत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण येथून शीलफाटा मार्गे, चेंबूर व्हाया उलवे नोड ते चिरनेर तसेच उपनगरी रेल्वे मार्गे पनवेलपर्यंत काही जण येत आहेत. अशा नागरिकाना ताब्यात घेऊन पोलिस महापालिकेच्या निवारा कक्षात ठेवत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले यातील काही नागरिक असल्यास निवारा केंद्रातील आधीच्या शेकडो नागरिकांना त्यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो.
यावर तातडीने उपाय काढून एक तर रेल्वे पोलिस आणि इतर सुरक्षा जवानांना कारवाई करण्यासाठी तंबी द्यावी, तसेच गावाकडे निघालेल्या वाटसरुंना वेगळ्या निवारा केंद्रात ठेवण्यात येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करावी.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पनवेल महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पाऊल उचलावे, अशी विनंती करतानाच हा विषय गांभीर्याने हाताळला जावा, अशी विनंती कडू यांनी दौंड आणि चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे मांडला आहे.

 518 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.